Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने व्यक्त केली नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा,Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:36 IST

'झुंड' सिनेमाने मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानवर जादू केलीय... आमीर असा काही भारावला की त्यानं आता नागराजसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून  नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं. सैराटसह नागराजच्या 'पिस्तुल्या' ही शॉर्टफिल्म आणि 'फँड्री' चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि भरघोस पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय.

'सैराट' सिनेमाची कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, आकर्षक असं चित्रीकरण, नागराज मंजुळेचे अफलातून दिग्दर्शन अशा अनेक गोष्टींमुळे नागराज मंजुळेचे सारेच मोठे फॅन बनलेत. रसिकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा नागराज मंजुळेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करु लागलेत. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर नागराजने हिंदी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केलं. पदार्पणातच तो चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'झुंड' सिनेमाचे दिग्दर्शन केले. 

'झुंड' सिनेमाने मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानवर जादू केलीय... आमीर असा काही भारावला की त्यानं आता नागराजसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकताच त्याने झुंड सिनेमा पाहिला यावेळी नागराजही आमिरसोबत होता. सिनेमा पाहिल्यानंतर आमिरने नागराजचे कौतुक केले आणि नागराज सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळतंय.  

नागराज मंजुळेची ही कलाकृती पाहून चांगलाच थक्क झाला त्याने फक्त नागराजचेच नाहीतर सिनेमात मुलांच्या कामाचेही कौतुक केले आहे.'झुंड' हा सिनेमा आणि छोट्यांची अदाकारी काळजाला भिडल्याची दिलखुलास प्रतिक्रिया यावेळी आमिरनं दिली.सध्या आमिरचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आगामी काळात आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य अक्किनेनी यांच्या सिनेमात भूमिका असणार आहेत. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूडचा हिंदी रिमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :नागराज मंजुळेआमिर खान