Join us

Aamir Khan: "तुम्ही धीर सोडू नका", आमिर खान आणि किरण रावने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:39 IST

Aamir Khan Meets Santosh Deshmukh Family: आमिर खानने घेतली संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट, किरण रावने दिला मायेचा आधार

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. हत्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देत संतोष देशमुख यांनी न्याय मिळवून द्यावा यासाठी मागणी होत आहे. देशमुख कुटुंबीय यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नुकतंच आमिर खानने (Aamir Khan) देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. 

पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खानने देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी आमिरची एक्स पत्नी किरण रावही उपस्थित होती. आमिर आणि किरणने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची विचारपूस करत त्यांच्याशी चर्चा केली. किरण रावने त्यांना "तुम्ही धीर सोडू नका" असं म्हणत आधार दिला. तर संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याला आमिरने मायेने जवळ घेत त्याला मिठी मारली. 

मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन.दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह आणखी काही आरोपींनी अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. खंडणीला विरोध केल्याने वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांची हत्या केली. ही घटना घडली त्या दिवशी, ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३:२२ वाजता सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोलनाका येथे अडवले. त्यानंतर त्यांचे काळी जीप व कार या दोन वाहनांमधून अपहरण केले. आरोपींनी प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाइप, क्लच वायर व काठीचा वापर केला. देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन गेले. तेथे अमानुष मारहाण करत खून केला. सायंकाळी ६:३० वाजताचे सुमारास त्यांचा मृतदेह दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले होते.

 

टॅग्स :आमिर खानसंतोष देशमुख हत्या प्रकरणबीडकिरण रावबीड सरपंच हत्या प्रकरणव्हायरल व्हिडिओ