अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या घरी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कसा झाला आणि त्यामागे नेमकं कारण काय होतं, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर आता सैफ अली खान याची पत्नी करिना कपूर हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडिया पोस्टवरून करिना कपूर हिने आपल्या भावना व्यक्त करतानाच चाहत्यांनाही कळकळीची विनंती केली आहे.
या पोस्टमधून करीना हिने पती सैफ अली खान याच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसेच थोडा धीर धरा आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नका, असं आवाहन तिनं केलं आहे. या पोस्टमध्ये करिना कपूर लिहिते की, आमच्या कुटुंबासाठी आजचा दिवस खूप आव्हानात्मक राहिला. आम्ही सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच हे सगळं नेमकं कसं घडलं, याचा विचार करत आहोत. या कठीण प्रसंगी मी प्रसारमाध्यमं आणि पापाराझींना विनंती करते की, कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, तसेच अयोग्य असेल असं कुठलंही वृत्तांकन करू नका.
करिना कपूर पुढे लिहिते की, तुम्हा सगळ्यांना असलेल्या काळजीचा आम्हाला जाणीव आहे. ज्या प्रकारे तुम्ही सातत्याने अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करता आहात ते पाहणं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही लोक ज्या पद्धतीने चिंतीत आहात, तिही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छिते की, आमच्या मर्यादांचा मान ठेवा, आम्हाला थोडा अवकाश द्या, त्यामुळे आमचं कुटुंब या प्रसंगातून सावरू शकेल, अशी विनंतीही करिना कपूर हिने केली.