अभिनेत्री आशिका भाटिया(Aashika Bhatia)च्या वडिलांचे निधन झाले आहे. ती लहानपणापासूनच चित्रपट तसेच टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटानंतर ती लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाली.
'प्रेम रतन धन पायो' फेम अभिनेत्रीने सोशल मीडिया इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी तुझ्यावर प्रेम करते, मला माफ कर, बाबा.' फोटोत ती तिच्या वडिलांसोबत सुंदर वेळ घालवताना दिसत आहे.
आशिका भाटियाने बालकलाकार म्हणून कलाविश्वात प्रवेश केला. एनडीटीव्ही इमॅजिनच्या 'मीरा' या शोमध्ये मीराच्या भूमिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर प्रवेश केला. यानंतर ती सोनी टीव्हीच्या 'परवरिश कुछ खट्टी कुछ मीठी' या मालिकेत दिसली होती, ज्यामध्ये तिच्या पात्राचे नाव 'गिन्नी' होते. आशिका भाटियाने सलमान खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि अनुपम खेर अभिनीत 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटात तिने सलमान खानच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील आशिकाच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. यानंतर आशिका रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीझन २' मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये अभिनेत्री वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती. आशिका सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या पोस्ट शेअर करत असते.