पित्याच्या मृत्यूच्या १२ वर्षांनंतर संजय दत्तने पूर्ण केली त्यांची अखेरची इच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 13:24 IST
अभिनेता संजय दत्त बुधवारी वाराणसीत पोहोचला. याठिकाणी तो आपल्या ‘भूमी’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार होता. पण याशिवाय इथे ...
पित्याच्या मृत्यूच्या १२ वर्षांनंतर संजय दत्तने पूर्ण केली त्यांची अखेरची इच्छा!
अभिनेता संजय दत्त बुधवारी वाराणसीत पोहोचला. याठिकाणी तो आपल्या ‘भूमी’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार होता. पण याशिवाय इथे जाण्याचा संजयचा आणखी एक हेतू होता. होय, तो म्हणजे, वडिल सुनील दत्त यांची शेवटची इच्छा पूर्ण करणे. त्यामुळे वाराणसीला पोहोचल्या पोहोचल्या संजयने सर्वांत आधी वडिलांची एक अधुरी इच्छा पूर्ण केली आणि मग चित्रपटाचे प्रमोशन केले.आता ही अधुरी इच्छा काय तर, सुनील दत्त याचा श्राद्धविधी. होय, याचठिकाणी श्राद्ध व्हावे, अशी सुनील दत्त यांची अखेरची इच्छा होती. संजयने ती पूर्ण केली. गत बुधवारी चार्टर्ड विमानाने संजय वाराणसीला पोहोचला आणि थेट राणी घाटावर गेला. याठिकाणी रखरखत्या उन्हात बसून सुमारे अर्धातास त्याने श्राद्धविधी केली. यावेळी २१ लीटरचा दुग्धाभिषेकही करत संजयने मुलाचे कर्तव्य पार पाडले. आठ पुजा-यांनी हा श्राद्धविधी पूर्ण केला. ALSO READ : Bhoomi Trailer Out : जबरदस्त अॅक्शनसह संजय दत्तची ‘वापसी’!या विधीवत श्राद्धविधीनंतर संजयने मीडियाशी संवाद साधला. माझे वडिल रूग्णालयात असताना त्यांनी त्यांची एक इच्छा माझ्याजवळ बोलून दाखवली होती. माझे पिंडदान काशीत व्हावे,अशी माझी इच्छा आहे. ती नक्की पूर्ण करशील, असे बाबा मला म्हणाले होते. त्यांची काशीत पिंडदानाची इच्छा मी आज पूर्ण केली. हा क्षण मला वेगळेच समाधान देणारा क्षण आहे, असे संजयने यावेळी सांगितले. वडिलांची इच्छा पूर्ण केल्यानंतर संजयला काशी विश्वनाथ मंदिर आणि काळवैभव मंदिरात दर्शन घ्यायचे होते. मात्र संजय आल्याचे कळताच चाहत्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीमुळे ऐनवेळी संजयला आपला नियोजित कार्यक्रम बदलावा लागला आणि तो प्रमोशनल इव्हेंटसाठी थेट येथील सनबीम शाळेत पोहोचला. ‘भूमी’तील संजयची सहअभिनेत्री अदिती राव हैदरी ही सुद्धा यावेळी हजर होती. ‘भूमी’मध्ये अदिती संजयच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट बापलेकीच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. ५८ वर्षांचा संजय या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. उमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे.