Archana Puran Singh: अर्चना पुरण सिंग (Archana Puran Singh) ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तसेच 'कपिल शर्मा शो' मध्ये आपल्या हास्याने रंगत आणणारी ही अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्चना पुरण सिंग बॉडी शेमिंगबद्दल भाष्य केलं आहे.
नुकतीच अर्चना पुरण सिंग आणि त्यांचे पती परमीत सेठी यांनी बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूरच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अर्चनाने सांगितलं की अंशुलाच्या फिटनेस प्रवासाने तिला खूप प्रेरणा मिळाली आहे, शिवाय ती अंशुलाच्या इंस्टाग्राम स्टोरीज देखील फॉलो करते. याचदरम्यान,अंशुलाने बॉडी शेमिंगबद्दल तिला आलेले अनुभव शेअर केले. त्याबद्दल बोलताना अर्चना पुरण सिंगने तिच्या बालपणीच्या कटू आठवणी शेअर केल्या. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "लहानपणी मला बरेच जण जाड म्हणून चिडवायचे. यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम झाला. त्यामुळे माझी कंबर जवळपास २६ इंच झाली होती, तरीही मला मी जाड आहे असं वाटत होतं." असं अभिनेत्रीने सांगितलं.
वर्कफ्रंट
अर्चना पुरण सिंगने पहिल्यांदाच बॉलिवूडचे बडे दिग्दर्शक बी.आर. चोप्रा दिग्दर्शित आणि निर्मित 'निकाह' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करण्यासोबतच अर्चना पूरण सिंग टीव्हीच्या दुनियेतही सक्रिय आहे. 'द कपिल शर्मा शो' आणि 'कॉमेडी सर्कस' या कॉमेडी शोमध्ये ती जज म्हणून ओळखली जाते.