सध्या सगळीकडे नवनवीन कंटेंट प्रेक्षकांना बघायला मिळतोय. हिंदी, मराठीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कथानकंही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अशातच नेटफ्लिक्सवर गाजलेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजची मेकर्सची नवीवेबसीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसीरिजचं नाव म्हणजे 'ब्लॅक वॉरंट'. विक्रमादित्य मोटवाने यांचं क्रिएशन असलेली 'ब्लॅक वॉरंट' या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच समोर आलाय. बिहारमधील तिहार जेलचं भयाण वास्तव या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिजचा ट्रेलर
'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये दिसतं की सुनील गुप्ता नामक अधिकाऱ्याची तिहार जेलमध्ये नियुक्ती होते. तिथे गेल्यावर सुनीलचा भयाण वास्तवाशी सामना होतो. जेलमधील कैद्यांमध्ये होत असलेली मारामारी, रक्तरंजितपणा, पोलिसांचा भ्रष्ट कारभार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकलेलं दडपण अशा अनेक गोष्टींचा सुनील सामना करतो. मग पुढे या वेबसीरिजचं कथानक कसं वळण घेतं, हे 'ब्लॅक वॉरंट' वेबसीरिज आल्यावर कळून येईल.
'ब्लॅक वॉरंट' कधी अन् कुठे रिलीज होणार?
या वेबसीरिजच्या माध्यमातून बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते शशी कपूर यांचा नातू ओटीटी विश्वात पदार्पण करतोय. झहान कपूर असं त्याचं नाव असून त्याची ही पहिलीच वेबसीरिज आहे. झहानसोबत या वेबसीरिजमध्ये राहूल भट, परमवीर सिंह चीमा, अनुराग ठाकुर, सिद्धांत गुप्ता आणि राजश्री देशपांडे हे कलाकार झळकणार आहेत. ही वेबसीरिज १० जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल.