Join us

वॉचमनची नोकरी केली, दोन वेळच्या जेवणाचेही होते वांदे, आज तोच नवाज आहे 150 कोटींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 08:00 IST

नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या छोकऱ्यानं आज बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांची यादी करायची म्हटले तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हे नाव त्यात ठळकपणे उठून दिसेल. खरं तर नवाजकडे ना चेहरा होता, ना फिजिक्स. पण फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्थात यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. आज नवाज त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. 

पार्टटाईम सिक्युरिटी गार्डची नोकरी...नवाजुद्दीनने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवलेत. पण याऊपरही अ‍ॅक्टिंग करिअरमध्ये त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. या काळात त्याने अगदी पार्ट टाईम सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीही केली. नवाज हा केमिस्ट्री विषयात ग्रॅज्युएट आहे. या क्षेत्रात त्याला मोठी संधी होती. पण त्याला अभिनयात रस होता. त्याने तेच केले. त्या एका सीनने लाईफ बदलली...नवाजुद्दीनला सुरुवातीच्या काळात मिळायचे ते छोटे-मोठे रोल. कुणीच त्याला चांगल्या भूमिका देईना. पाकिटमार किंवा वेटर इतक्यात भूमिका त्याला ऑफर होत होत्या. पण अशाच एका छोट्याशा भूमिकेने, छोट्याशा सीनने त्याचे आयुष्य बदलले. होय, अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमात असगर मुकादमची एक छोटीशी भूमिका त्याच्या वाट्याला आली. या छोट्याशा भूमिकेतही नवाजने असा काही जीव ओतला की, अनुराग कश्यप एकदम त्याच्यावर फिदा झाला होता.

पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एका रिपोर्टनुसार, नवाजची एकूण संपत्ती 150 कोटींच्या घरात आहेत. दर महिन्याला तो सुमारे 1 कोटींची कमाई करतो. नवाजकडे महागड्या गाड्या आहेत. यात मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, ऑडी सारख्या अलिशान गाड्या आहेत. नवाज एका सिनेमासाठी सुमारे 6 कोटी रूपये घेतो तर ब्रँडच्या प्रमोशनसाठी सुमारे 1 कोटींपर्यंत फी घेतो.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी