अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण याचा आज (४ नोव्हेंबर) वाढदिवस. आज मिलिंद आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय आणि वयाच्या या टप्प्यावरही तो कमालीचा फिट आहे. ९ व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग चॅम्पियनशिप जिंकणा-या मिलिंदने ‘आर्यन मॅन’चा किताबही जिंकला आहे. पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मिलिंद आपल्या उभ्या आयुष्यात कधीही जिममध्ये गेलेला नाही.
गत एप्रिल महिन्यात मिलिंदने स्वत:पेक्षा २५ वर्षांनी लहान अंकितासोबत लग्न केले. मिलिंदचे हे दुसरे लग्न आहे. २००६ मध्ये त्याने अभिनेत्री मिलिन जॅम्पेनोईसोबत लग्न केले होते. पण तीन वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला होता.
दोन दशकांपूर्वी मिलिंद आणि मधू सप्रे यांच्या टफ शूजच्या जाहिरातीने प्रचंड खळबळ उडवली होती. दोघांनीही पूर्णपणे नग्न अवस्थेत केवळ अंगावर अजगर घेऊन फोटोशूट केले होते. हे फोटोशूट त्यांना चांगलेच महागात पडले होते. या एका फोटोशूटमुळे जाहिरातीविरोधात दोघांवर खटलाही दाखल करण्यात आला होता.मिलिंद आणि मधू यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात जवळपास एकत्रच केली. त्याशिवाय मिलिंद आणि मधू यांच्या अफेअरच्या किस्सेही खूप गाजले. अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअपचीही त्यावेळी फार चर्चा झाली होती.ब्रेकअप झाल्यानंतरही मिलिंद मधूला विसरू शकला नव्हता. त्यामुळे एरव्ही उघडपणे न बोलणा-या मिलिंदने ब्रेकअपनंतर मी आजही मधूच्या प्रेमात असल्याची जाहिर कबुली दिली होती. पण मधू मिलिंदजवळ पुन्हा परतलीच नाही. त्या लव्हस्टोरीला तिथेच पूर्णविराम लावत तिने इटालियन बिझनेसमनसोबत लग्न केले.