अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) ‘बिग बॉस मराठी 4’ च्या (Bigg Boss Marathi 4) घरातून बाहेर पडली आहे. मात्र घरातून बाहेर पडताच तिने ‘बिग बॉस मराठी 4’चा स्पर्धक योगेश जाधववर (Yogesh Jadhav) अनेक गंभीर आरोप केले होते. योगेशबद्दल तिने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ‘योगेश जसा दिसतो तसा नाही. त्याचा खरा चेहरा वेगळा आहे. त्याचा तोंडावर अजिबात ताबा नाही. योगेश प्रत्येक गोष्ट पैशांसाठी करतो. सतत पैशांच्या गोष्टी करतो. दरवेळी ताई पैसे पाहिजेत का? नाचून दाखवता का? असेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर यायचे. ताई मला एक लाख रूपये द्या, मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो, असं सतत तो म्हणायला...,’ असे एक ना अनेक आरोप तिने योगेशवर केले होते.
मेघा घाडगेनंतर योगेश जाधवही ‘बिग बॉस मराठी 4’मधून बाहेर पडला. घराबाहेर पडल्यावर त्याने मेघाच्या या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं होतं. आम्हा दोघांमध्ये गैरसमज झाले आहेत. मेघा ताईला भेटून मी ते गैरसमज दूर करणार असल्याचं त्याने म्हटलं होतं. आता योगेशनं खरंच मेघाची भेट घेतली असून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हे फोटो पाहून बिग बॉस मराठीचे चाहते मात्र भडकले आहेत.
मालक म्हणजे आम्ही येडे, असं हे फोटो पाहून एका चाहत्याने लिहिलं आहे. म्हणजे शो स्किप्टेड आहे, यांच्यासाठी आपण बाहेर भांडतो आणि हे एकत्र येवून मज्जा करतात. सगळे सीजनचे लोक असेच, अशा शब्दांत एका चाहत्याने आपला संताप व्यक्त केला आहे. मेघा ताई एवढं लाईव्ह येऊन शिव्या, राग येण्याबद्दल बोलणं आणि तरी पण तू त्याचं तोंड पाहिलंस, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. आताच्या घडीला महाराष्ट्र राजकारण काही होऊ शकत तसं बिग बॉस झालंय, अशा अनेक कमेंट्सही या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.