बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरातच चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसला असून त्याचा फोटोही जारी करण्यात आला आहे. हल्लेखोराने सैफच्या घरात काय केले याची मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ-करिनाच्या मुलांना सांभाळणाऱ्या दायीला ओलीस ठेवत तिच्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केली होती, असे चौकशीत समोर येत आहे.
सैफवर रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. पोलिसांना संशयीत आरोपी सैफच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एक सीसीटी फुटेज मिळाले आहे.
सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फायर एग्झिटच्या पायऱ्यांवरुन घरात घुसला होता असा पोलिसांचा कयास होता. परंतू, मुलांना सांभाळणाऱ्या दायीने दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराने दायीकडे पैशांची मागणी केल्याचे समोर येत आहे.
हल्लेखोर घरात घुसला तेव्हा त्याने तैमुरला आणि दायीला पाहिले. त्याने तिच्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केली. त्याने सैफ अली खानकडे काही मागितले नाही. तसेच मुलांनाही ओलीस ठेवले नाही. त्याने मुलांना सांभाळणाऱ्या दायीला ओलीस ठेवले होते. तिने आरडाओरडा करताच हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला. ते ऐकून सैफ धावत तिथे आला. यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोराने सैफवर सहा वेळा चाकुचे वार केले, असे चौकशीत समोर येत आहे.