Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 18:13 IST

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचे मालिकेत दर्शन होत होते. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एण्ट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरुन कथा गुंफण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेच्या रुपात ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाचे दर्शन घेता येणार आहे.

ज्योतिबाच्या या भव्य दिव्य रुपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखील अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणार आहे. त्यामुळे दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचे यापुढील भाग भक्तीरसाने परिपूर्ण असे असतील.

अभिनेता विशाल निकम मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. ज्योतिबाच्या अनेक पौराणिक कथा वाचण्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट विशालने आत्मसात केली ती म्हणजे घोडेस्वारी. कमी कालावधीत विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. यासोबतच विशालने या भूमिकेसाठी १२ किलो वजनही वाढवलं आहे. मुळचा सांगलीचा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्याला आपसुकच येत होता. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या यापुढील प्रवासासाठी विशाल खुपच उत्सुक आहे.

मालिकेच्या भव्यतेविषयी सांगताना निर्माते महेश कोठारे म्हणाले, या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरु आहे. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हे देखिल आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. दख्खनचा राजा ज्योतिबा सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पहायला मिळेल.

टॅग्स :महेश कोठारे