Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भूतनाथ ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:28 IST

'भूतनाथ' आणि 'भूतनाथ २' सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर या सिनेमाचा तिसरा भाग 'भूतनाथ ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ठळक मुद्दे 'भूतनाथ ३' अमिताभ बच्चन यांच्यासोबत शाहरूख खानही दिसणार

'भूतनाथ' आणि 'भूतनाथ २' सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर या सिनेमाचा तिसरा भाग 'भूतनाथ ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूतनाथची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 

२००८ साली प्रदर्शित झालेल्या 'भूतनाथ' सिनेमात एका लहान मुलाची भाबडी कथा पाहायला मिळाली तर दुसऱ्या भागात राजकीय अँगल देण्यात आला होता, ज्यात मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसऱ्या भागात एका सामाजिक विषयावर भाष्य करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या तिसऱ्या भागात शाहरुख खान सुद्धा अमिताभ बच्चन यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'भूतनाथ'च्या या तिसऱ्या भागाच्या निर्मितीसाठी टी-सिरीजचे भूषण कुमार आणि बी.आर स्टुडिओजने हातमिळवणी केली आहे.

याच चित्रपटाबाबत बोलताना भूषण कुमार म्हणाले,' काही वर्षांपूर्वी भूतनाथ रिटर्नच्यावेळीसुद्धा आम्ही बी.आर स्टुडिओजसोबत काम केले होते. तेव्हापासूनच आमचे संबंध खुप छान जुळून आले. अमितजींसोबत काम करण्यात तर फारच मजा आली. आगामी सिनेमात बी आर स्टुडिओजसोबतच्या क्रिएटिव्ह पार्टनरशिपला आम्हाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे.'बी. आर. फिल्म्स आणि भूषण कुमार भूतनाथ फ्रेंचाइजी व्यतिरिक्त आणखीन दोन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. यातील एका चित्रपटाचे दिग्दर्शन 'हॅप्पी भाग जायेगी'चे दिग्दर्शक मुदस्सर अजीज करणार आहेत. आता 'भूतनाथ ३'ची कथा व त्यात कोण कोण कलाकार पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनशाहरुख खान