Join us

'कपिलसोबत काम करण्याचा माझा विचार..'; 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून भारती सिंहचा पत्ता कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:46 IST

The Great Indian Kapil Show: तब्बल ७ वर्षानंतर सुनील ग्रोवर, कपिल शर्मासोबत काम करणार आहे. तर, सुनीलच्या एन्ट्रीनंतर भारतीची या कार्यक्रमातून एक्झिट झाली आहे.

कपिल शर्मा (Kapil Sharma) हे नाव कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. यामध्येच आता त्याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यावेळी हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होणार नसून Ott वर रिलीज होणार आहे. परंतु, पर्वामध्ये लाफ्टरक्वीन भारती सिंहने (Bharti singh) मात्र काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

द ग्रेट इंडियन कपिल (The Great Indian Kapil Show)  शो या कार्यक्रमामध्ये तब्बल ७ वर्षानंतर सुनील ग्रोवर काम करणार आहे. तर दुसरीकडे मात्र भारतीने या शोमधून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी नुकतीच भारतीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमाचा भाग नसण्यामागचं कारण सांगितलं.

भारती सिंहने नुकतीच 'इ टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कपिलच्या शोचा पार्ट नसण्यावर भाष्य केलं. "सध्या तरी कपिलसोबत काम करण्याचा माझा कोणताही विचार नाहीये. पण जर खरंच अशी काही संधी मिळाली तर मी नक्कीच त्यात काम करेन. सध्या मी माझ्या प्रोजेक्ट्स, पॉडकास्ट आणि डान्स दिवानेच्या शुटिंगमध्येच बिझी आहे. पण, जर मला फोन आला तर मी नक्कीच जाईन. सध्या तरी माझ्या पदरात बरंच काही आहे आणि नवीन गोष्टी करायला माझ्याकडे वेळ नाही", असं भारती म्हणाली.

दरम्यान, नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहता या कार्यक्रमात यंदा  कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकुर आणि सुनील ग्रोवर ही कलाकार मंडळी झळकणार आहेत. हा कार्यक्रमत ३० मार्च रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

टॅग्स :वेबसीरिजभारती सिंगकपिल शर्मा सुनील ग्रोव्हरटिव्ही कलाकार