Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली, RRR फेम प्रसिद्ध कलाकाराचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:03 IST

ऑस्कर जिंकणाऱ्या RRR आणि बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराने वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यामुळे सर्वांनी शोक व्यक्त केलाय

सुप्रसिद्ध संगीतकार आणि RRR या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारे एम.एम. कीरवाणी यांचे वडील आणि प्रसिद्ध गीतकार शिव शक्तिदत्ता यांचे सोमवारी ८ जुलै रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. हैदराबाद येथील मियापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिव शक्तिदत्ता हे केवळ गीतकारच नव्हते, तर पटकथालेखक, कवी आणि लेखक म्हणूनही त्यांचा सिनेसृष्टीत मोठा सन्मान होता. त्यांनी ‘बाहुबली’, ‘आरआरआर’, ‘मगधीरा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीते आणि संवाद लिहिले होते.

शिव शक्तीदाता यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. संस्कृत आणि पारंपरिक भाषेचा करुन शिव शक्तीदत्ता यांच्या लिखाणाची वेगळीच ओळख सिनेसृष्टीत होती.  त्यांचा मुलगा एम.एम. कीरवाणी हे संगीतकार असून त्यांनी RRR मधील 'नाटू नाटू' या गाण्यासाठी ऑस्कर मिळवला आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली हे त्यांचे पुतणे होत. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत म्हटलं, “शिव शक्तिदत्ता यांचे योगदान अमूल्य होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.” चिरंजीवी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली. शिव शक्तिदत्ता यांचे अंतिम संस्कार हैदराबादमध्ये मंगळवारी पार पडले. त्यांच्या निधनामुळे केवळ सिनेसृष्टीच नाही, तर साहित्यिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :आरआरआर सिनेमाबाहुबलीऑस्करबॉलिवूडTollywoodटिव्ही कलाकार