Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच भेटीत आशुतोष राणा झाले होते क्लीन बोल्ड, अशी आहे आशुतोष आणि रेणुका शहाणेची लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 11:46 IST

पहिल्या भेटीतच आशुतोष राणा यांना रेणुका फार आवडली होती. रेणुकासह मैत्री करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्याही लढवल्या.

ठळक मुद्देआशुतोष आणि रेणुका यांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळाचा ब्रेक घेतला.

रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस असून त्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट अभिनेत्री राजेश्वरी सचदेवमुळे झाली होती. पहिल्या भेटीतच आशुतोष राणा यांना रेणुका फार आवडली होती. रेणुकासह मैत्री करण्यासाठी त्यांनी अनेक युक्त्याही लढवल्या, त्याकाळात मोबाईल फोनचा इतका वापर नव्हता. रेणुकाला संपर्क करायचा असेल तर घरी असलेल्या लँडलाईन फोनवरच संपर्क करावा लागायचा.

यातही फोनवर आलेले सगळे कॉल रेकॉर्ड व्हायचे. रेकॉर्ड झालेले कॉल रेणुकाला महत्त्वाचे वाटले तरच ती पुन्हा कॉल करायची. एकदा रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आशुतोष यांनी तिच्या घरी फोन केला. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर रेणुकाने फोन करून आशुतोष यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते अनेकवेळा फोनवर एकमेकांशी बोलायला लागले. रेणुकालाही आशुतोष आवडायला लागल्याने हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या. एक कविता ऐकवत आशुतोष यांनी रेणुकाला प्रपोज केले होते. त्यानंतर काहीच महिन्यांत कुटुंबियांच्या संमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न ठरल्यानंतर रेणुकाच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते. दोन्ही कुटुंबातील परंपरा, रीतीरिवाज खूप वेगळे होते. मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा लग्नाला तयार झाल्या. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 25 मे 2001 मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले.

आशुतोष आणि रेणुका यांना शौर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत. मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळाचा ब्रेक घेतला. मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये रेणुकाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. रिटा या सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शन तिने केले.

टॅग्स :रेणुका शहाणेआशुतोष राणा