Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 14:29 IST

पोस्ट वाचून व्हाल भावूक...

ठळक मुद्देआशुतोष व मयुरी यांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती.

‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरेने गेल्या 29 जुलै रोजी नांदेमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि  डिप्रेशनमुळेच त्याने   हे टोकाचे पाऊल का उचलल्याचे मानले जात आहे.  आशुतोष व मयुरी यांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. काल 11 ऑगस्टला आशुतोषचा वाढदिवस होता. पण हा वाढदिवस साजरा करायला मयुरीसोबत आशुतोष नव्हता. मयुरीने आशुतोषच्या वाढदिवसा निमित्ताने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली.

 

मयुरीने लिहिले,‘आशुडा, तुझ्या वाढदिवसाला हा सर्वोत्तम केक तयार करण्यासाठी लॉकडाउनमध्ये मी ३० केक तयार केले. तू त्या सर्व केकचा पहिला घास घेतला होतास, पण हा केक भरवण्यासाठी आज तू नाहीस. ३० वा वाढदिवस अ‍ॅडव्हान्समध्ये साजरा करण्याची ही तुझी पद्धत होती का ? आमच्यासाठी अनेक प्रश्न तू मागे ठेवून गेलास...    तू जे केलेस तो भ्याडपणा नाही तर दीर्घकाळापासून नैराश्यासोबत सुरु असलेल्या संघषार्तून आलेली असहाय्यता होती, हे आम्हाला ठाऊक आहे. गुणी बाळ माझं ते, पण खरे सांगू आपण नैराश्यावर मात करण्याच्या फार जवळ आलो होतो. आपण किती चांगले काम करत होतो. फक्त अजून थोडे कष्ट घेण्याची गरज होती...

अजून थोडा संयम, अजून थोडा धीर आणि नंतर एक निरोगी आणि आनंदी आयुष्य तुझी वाट पाहत होते.  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास याबद्दल तुझा राग करावा की जितका वेळ माझ्यासोबत होतास त्यासाठी आभार मानावेत? पण आता त्याने काय फरक पडतो?तुझ्याा आत्म्याचा शांततेत प्रवास व्हावा. देव तुला योग्य मार्गदर्शन करतील, यासाठी आम्ही सतत प्रार्थना करत असतो. आता त्या देवदूतांचे तरी ऐक, नेहमीप्रमाणे हट्टीपणा करु नकोस...

मी, अभी, मम्मी, पप्पा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू असताना आम्ही ते पुरेपूर व्यक्त केले असावं अशी आशा आहे..इतक्या वेदना होत असतानाही तू माझ्यावर इतके प्रेम केलेस, मीदेखील तेच करेन..वाढदिवसाच्या शुभेच्छा!!तुझीच#बायकोतुझीनवसाची

टॅग्स :मयुरी देशमुख