Join us

"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:09 IST

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; प्रसिद्ध लेखक म्हणतात...

प्रत्येक राज्यात हिंदी सक्ती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापलं. पहिलीपासून हिंदी सक्ती या सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही आक्रमक झाले. मराठी भाषा प्रेम हा मुद्दा या दोन भावांना २० वर्षांनी एकत्र घेऊन आला. हिंदी सक्तीच्या विरोधात ते मोर्चा काढणार होते त्याआधीच सरकारने जीआर मागे घेतला. यानंतर दोन्ही भावांनी विजयी मेळावा घेतला ज्यात ते एकाच व्यासपीठावर आले. ही त्यांच्या युतीची सुरुवात आहे असंही एक चित्र दिसून आलं. या सगळ्यावर प्रसिद्ध लेखकाने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, "भाऊ वेगळे झाले की शेतात बांध तुटतो, भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो.  भाऊ एक झाले की शहराला बळ येतं. गावाला तर येणारच. एक व्हायचं. गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. गावांसाठी एक होऊ." 

हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनीही सरकारचा विरोध केला होता. हेमंत ढोमे, समीर चौघुले, मकरंद अनासपुरे यांनीही आवाज उठवला होता. अखेर तो निर्णय मागे घेतल्याने सर्वांचाच विजय झाला. तसंच हा मुद्दा दोन भावांना म्हणजेच ठाकरे बंधुंना इतके वर्षांनी एकत्रही घेऊन आला. गावाकडे होणार भाऊबंदकी आणि नंतर त्यांचं एकत्र येणं किती आनंदाचं असतं तसंच काहीसं हेही असल्याचं म्हणत लेखक अरविंद जगताप त्यांच्या पोस्टमधून व्यक्त झाले आहेत. 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र