Join us

'भूमिकन्या' मालिकेसाठी अनुष्का बोऱ्हाडेने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 17:59 IST

Anushka Borhade: सोनी मराठी वाहिनीवरील भूमिकन्या- साद घालते निसर्गराजा ही मालिका एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे मुख्य भूमिकेत आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील भूमिकन्या- साद घालते निसर्गराजा (Bhumikanya Serial) ही मालिका एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे (Anushka Borhade) मुख्य भूमिकेत आहे. तिने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. मालिकेत अनुष्का लक्ष्मीच्या भूमिकेत असून लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत कणखर भूमिकन्या म्हणून आपल्या वडिलांच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहते ? याची रंजक कथा भूमिकन्या -साद घालते निसर्गराजा या मालिकेत आहे.  

अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिने भूमिकेची गरज म्हणून  ट्रॅक्टर कसा चालवायचा हे शिकून आपल्या भूमिकेची तयारी केली आहे. यासोबत नांगर धरणे, गोफण फिरवणे या गोष्टीही तिने शिकून घेतल्या. शेतकरी  कुटूंबात लहानाची  मोठी  झाल्याने   लहानपणापासून  शेतीची काम बघितल्याने या भूमिकेसाठी त्याचा तिला फायदा झाला. या भूमिकेत शिरण्यासाठी तिने घतलेली मेहनत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. ही मेहनतच भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत अनुष्का व्यक्त करते.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अनुष्का सांगते की, भूमिकन्या -साद घालते निसर्गराजा या मालिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. मी ही भूमिका एन्जॉय केली. माझी ही भूमिका प्रेक्षकांनाही चकीत करणारी असेल हे नक्की. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेली भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा ही  मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता  सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते. मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे  सोबत अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे. 

टॅग्स :गौरव घाटणेकरश्रुती मराठे