सध्या अनेक जुने सिनेमे पुन्हा रिलीज होण्याचा एक ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरु आहे. 'कल हो ना हो', 'तुंबाड', 'कुछ कुछ होता है', 'नाम' या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एक सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा गेली २२ वर्ष रखडला होता. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपचा हा पहिला सिनेमा होता. या सिनेमाचं नाव 'पाँच'. पुण्याला हादरवणारा भयंकर घटनेवर आधारीत हा सिनेमा अखेर रिलीज होणार आहे. जाणून घ्या सिनेमाचा विषय.
काय आहे सिनेमाचा विषय?
'पाँच' सिनेमा पुण्याला हादरवणाऱ्या जोशी-अभ्यंकर प्रकरणावर आधारीत आहे. पुण्यामध्ये १९७६-१९७७ काळात काही तरुण मुलांनी केलेल्या खून खटल्यावर आधारीत या सिनेमाचं कथानाक. सिनेमाच्या विषय आणि आशयावर २००३ साली सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. परंतु नंतर हा सिनेमा ऑनलाईन वेबसाईट आणि इतर फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला. अखेर निर्मात्यांनी 'पाँच' सिनेमा रिलीज करण्यासाठी योजना आखली असून पुढील वर्षी २०२५ साली सिनेमा रिलीज होणार आहे.
'पाँच'मध्ये कलाकार कोण आहेत?
'पाँच' या सिनेमात आदित्य श्रीवास्तव, के के मेनन, विजय मौर्या, जॉय फर्नांडीस आणि तेजस्विनी कोल्हापुरेंनी भूमिका साकारल्या होत्या. अनुराग कश्यपने हा सिनेमा लिहून दिग्दर्शितही केला होता. सिनेमा नेमका रिलीज होणार याबद्दल निश्चित माहिती नाही. तरी निर्माते टूटू शर्मा यांनी 'पाँच'ला थिएटरमध्ये रिलीज करण्याची तयारी दाखवल्याने अनेकांना हा सिनेमा आता सिनेमागृहांत पाहता येईल.