Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द केरळ स्टोरी २' बकवास प्रोपोगंडा सिनेमा..., अनुराग कश्यपचा संताप, निर्मात्यावरही ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:15 IST

असं कोण बीफ खायला घालतं? अशा प्रकारे तर कोणी खिचडीही..., अनुराग कश्यप काय म्हणाला?

२०२३ मध्ये गाजलेल्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटानंतर आता त्याचा सिक्वेल 'द केरल स्टोरी २: गोज बियॉन्ड' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमा वादात अडकला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या चित्रपटाला 'निव्वळ प्रोपोगंडा' आणि 'बकवास' म्हटलं आहे.  ट्रेलरमधील बीफ खाऊ घालण्याच्या दृश्यावर आक्षेप घेत त्याने निर्मात्यांना 'लोभी' संबोधलं असून, केवळ पैसा कमावण्यासाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी हा चित्रपट बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

कोच्ची विमानतळावर माध्यमांशी बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, "द केरळ स्टोरी २ बकवास सिनेमा आहे. हा एक बकवास प्रोपगंडा सिनेमा आहे. ट्रेलरमध्ये जे दाखवलंय त्याप्रमाणे कोण बीफ खायला लावतं? अशाप्रकारे तर कोणी खिचडीही खाऊ घालत नाही. या लोकांना फक्त पैसा कमवायचा आहे. लोकांमध्ये फूट पाडायची आहे. सिनेमाचा मेकर तर एकदम लोभी माणूस आहे. त्याला फक्त पैसा मिळवायचा आहे.

राजकीय विरोध आणि मुख्यमंत्र्यांची भूमिकाकेवळ चित्रपटसृष्टीतूनच नव्हे, तर राजकीय स्तरातूनही या चित्रपटाला कडाडून विरोध होत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या चित्रपटाचा उल्लेख 'विषारी आणि खोटा' असा केला आहे. हा चित्रपट राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी धोकादायक असून तो जाणीवपूर्वक केरळची बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. चित्रपटाच्या कथानकातून विशिष्ट अजेंडा राबवला जात असल्याचे सांगत सरकारी पातळीवरूनही यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

न्यायालयीन कचाट्यात 'द केरल स्टोरी २'दुसरीकडे, केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला (CBFC) नोटीस बजावली आहे. चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. चित्रपटाच्या नावामुळे आणि काही विशिष्ट दृश्यांमुळे केरळची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा याचिकाकर्ते श्रीदेव नंबूथिरी यांनी केला आहे. कामाख्य नारायण सिंह दिग्दर्शित आणि विपुल शाह निर्मित हा चित्रपट २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधीच कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर हा चित्रपट मोठ्या वादात अडकला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'The Kerala Story 2': Anurag Kashyap slams propaganda, greedy makers.

Web Summary : Anurag Kashyap calls 'The Kerala Story 2' propaganda, criticizing its beef scene and accusing makers of greed and societal division. Kerala's CM also opposed the film, deeming it divisive. The film faces legal challenges over its portrayal of Kerala.
टॅग्स :अनुराग कश्यपबॉलिवूड