Join us

विठूरायाच्या शोधात अनिकेत विश्वासराव, 'डंका…हरीनामाचा' १९ जुलैला येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 19:11 IST

Danka...Harinama Movie : ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला आहे.

आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी एक आनंद सोहळाच... पंढरीच्या वारीत वारकरी पांडुरंगाचे नाव घेत मोठ्या श्रद्धेने चालतात, त्या प्रवासातच त्यांना पांडुरंग भेटत असावा. अभिनेता अनिकेत विश्वासराव हा मात्र या विठूरायाचा शोध घेतोय. हा शोध तो कशासाठी घेतोय?  हे जाणून घ्यायचं असेल तर रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका…हरीनामाचा’ (Danka...Harinama Movie) हा  चित्रपट  तुम्हाला पहावा लागेल. हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात रिलीज होतोय. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे.

‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच समोर आला असून, ‘चला आपण आणू आपल्या विठुरायाला’... असं अनिकेत  बोलताना दिसतोय. विठ्ठलाच्या शोधात असतांना अनिकेतच्या हाती काय येतं? आणि हा शोध नेमका कुठे संपतो ? याची उत्सुकता प्रदर्शित झालेल्या टीझरवरून निर्माण झाली आहे. अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे,  प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार,किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव  या कलाकारांची झलक सुद्धा या टीझरमध्ये पहायला मिळतेय. 

‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनिकेत सांगतो, या चित्रपटात मी जना ही व्यक्तिरेखा साकारतोय. भक्तीत लीन होणारा, श्रद्धाळू, बापासाठीअगदी श्रावणबाळ असलेला जना परंपरागत विठ्ठल मंदिर वाचवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप सुंदर अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे.  १९ जुलैला हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय.  ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटाची निर्मिती रविंद्र फड यांनी केली असून कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र  स्टुडिओज, अमेय खोपकर,अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.

टॅग्स :अनिकेत विश्वासराव