बॉलिवूडमध्ये अनेक नेपोटिझम हा वादाचा मुद्दा ठरला आहे. मोठमोठे सेलिब्रिटी त्यांच्या स्टारकिड्सला सिनेमांतून बॉलिवूडमध्ये लॉन्च करतात. अनेकदा नेपोटिझमवर चर्चाही होताना दिसतात. पण, आता पहिल्यांदाच बिग बी अमिताभ बच्चन यांनी नेपोटिझमवर भाष्य केल्याचं दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी नेपोटिझमवर व्यक्त होताना लेकाची बाजू घेतली आहे.
अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ते ट्वीटच्या माधम्यातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता बिग बींच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करत नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. एका X अकाऊंटवरुन अभिषेक बच्चनचा व्हिडिओ शेअर करत एक ट्वीट करण्यात आलं होतं. यामध्ये "अभिषेक बच्चन विनाकारण नेपोटिझमच्या नकारात्मकतेचा बळी ठरला. पण, तरीदेखील त्याच्या करिअरमध्ये त्याने चांगले चित्रपट दिले", असं म्हटलं होतं.
हे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन रिट्वीट केलं आहे. त्यांनी हे ट्वीट करत "मलादेखील असंच वाटतं...आणि एक वडील म्हणून हे वाटत नाही", असं म्हटलं आहे. बिग बींनी केलेल्या या ट्वीटची प्रचंड चर्चा रंगली आहे.
अभिषेक बच्चनने २००० साली रेफ्युजी सिनेमातून पदार्पण केलं होतं. पण, अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करूनही त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. कायमच त्याची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली गेली. 'पा', 'दिल्ली-६', 'घूमर', 'बिग बूल', 'गुरू' या सिनेमांमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या.