Join us
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय- अमिताभ बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 06:51 IST

शानदार सोहळ्यात लता मंगेशकर पुरस्काराने ‘बिग बी’ सन्मानित, लताजींचा स्वर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा धागा, अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

मुंबई : माझ्या वडिलांना जेव्हा लता मंगेशकरांबाबत विचारले तेव्हा ते केवळ ‘शहद की धार’ इतकेच म्हणाले. त्यांच्या गायनात मधाचा गोडवा होता. जशी मधाची लय कधी तुटत नाही, तसा त्यांचा सूर कधी तुटला नाही. लता मंगेशकरांचा स्वर आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा धागा आहे, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी ‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’ अशी रचना असलेली ‘आकाशाची सावली’ ही मराठी कविता वाचून उपस्थितांची मने जिंकली. लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 

विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ वा पुण्यतिथी सोहळ्यात मा. दीनानाथ मंगेशकर व लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

इतका मोठा पुरस्कार मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी कधीच स्वत:ला या पुरस्कारसाठी योग्य मानले नाही. हृदयनाथ मंगेशकरांनी मागच्या वर्षीसुद्धा बोलावले होते, पण मी तब्बेत ठीक नसल्याचे सांगितले. खरे तर मी चांगला होतो, पण मला यायचे नव्हते. या वर्षी माझ्याकडे कोणते कारण नसल्याने त्यांचे आमंत्रण स्वीकारावे लागले. लताजींनी माझ्या कुटुंबावर नेहमीच प्रेम केले. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या आदराचे वर्णन शब्दांत करू शकणार नाही - अमिताभ बच्चन

मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय 

एका कार्यक्रमात मी हिंदीत बोलत असताना मराठीतून बोलण्याची मागणी आली. तेव्हा मी मराठी शिकत असल्याचे सांगून स्वत:चा बचाव केला. या गोष्टीला १०-१२ वर्षे झाली, पण अद्याप मी मराठी शिकू शकलो नाही. पण आता वृद्धावस्थेत वेळ मिळत असल्याने मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अमिताभ म्हणाले.

अशोक सराफ यांचाही सन्मानगायक रूपकुमार राठोड यांना प्रदीर्घ संगीत सेवेसाठी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर संगीतकार ए. आर. रहमान यांना दीर्घकाळ संगीत सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य-सिनेसृटीतील प्रदीर्घ सेवेसाठी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना सिनेसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी, भाऊ तोरसेकर यांना प्रदीर्घ पत्रकारितेसाठी, अभिनेता अतुल परचुरेला प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी, अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा यांचा उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :अमिताभ बच्चन