२००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता होता. या सिनेमातील डायलॉग आणि गाणीही प्रचंड हिट झाली होती. या सिनेमात अमिषा पटेल हिने सकीनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. २२ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. २०२३ मध्ये 'गदर २' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. आता 'गदर २'च्या क्लायमेक्सबद्दल अमिषा पटेलने मोठा खुलासा केला आहे.
'गदर २'बाबत अमिषाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने क्लायमेक्समध्ये सकीनाचा मोठा रोल होता, असं म्हटलं आहे. शिवाय व्हिलनलाही सकीनाच मारणार होती, असं अमीषाने म्हटलं आहे. अमिषाला X वर एका चाहत्याने 'गदर २'च्या क्लायमेक्सबाबत प्रश्न विचारला होता. "'गदर २'च्या क्लायमेक्समध्ये व्हिलनला तू मारणार होतीस? हे खरं आहे का?" असं चाहत्याने विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना अमिषाने सिनेमाचा क्लायमेक्सच बदलल्याचा खुलासा केला.
"हो, सकीनाला दिग्दर्शकाने सांगितलं होतं की ती व्हिलनला मारणार आहे. पण, मला न सांगताच क्लायमेक्सचं शूटिंग केलं गेलं. जे झालं ते झालं. अनिलजी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत आणि त्यांना या गोष्टी माहीत आहेत. मला माहीत आहे की अनिलजींना देखील याबाबत आता वाईट वाटत असेल. 'गदर २'ने रेकॉर्ड रचला आहे. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे", असं अमिषाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
'गदर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या सिनेमाने देशभरात तब्बल ५२४.७५ कोटी तर जगभरात ६९१ कोटींचा गल्ला जमवला होता. सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनिष वाढवा, सिमरत कौर अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती.