Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:26 IST

तमिळनाडूमध्ये शूटच्या वेळी झाली भेट, खूप मजेशीर आहे किस्सा

अमेय वाघ (Amey Wagh) मराठी तसंच आता हिंदीतही काम करणारा प्रभावी अभिनेता. त्याचा नुकताच 'लाईक आणि सबस्क्राईब' सिनेमा रिलीज झाला. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त त्याने अनेक मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत त्याने शाहरुखसोबतच्या भेटीचा मजेशीर किस्सा सांगितला. काय आहे तो किस्सा वाचा.

अमेय वाघ अगदी २०-२१ वर्षांचा असताना शाहरुख खानला भेटला होता. अजब गजब पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "'बिल्लू' सिनेमात इरफान खान, शाहरुख खान होते. त्यात मी छोटी भूमिका केली होती. सिनेमाच्या लेखिकेने मला फोन केला होता. त्या म्हणाल्या, 'रसिका जोशी यांनी तुझं नाव सुचवलंय असं त्या म्हणाल्या. मला एका भूमिकेसाठी मुलगा हवा आहे तर तू भेटायला ये.' मी म्हटलं, 'मी लंडनमध्ये आहे नाटकाच्या प्रयोगासाठी आलोय.' मी पहिल्यांदाच लंडनला गेलो होतो. तेव्हा एवढे पैसेही नव्हते की मी फ्लाईट प्रीपोन करेन. त्या म्हणाल्या, 'अरे असं काय करतो मी प्रियदर्शन सरांना तुझ्याबद्दल सांगितलंय. या सिनेमात सगळी चांगली लोक आहेत. इरफान खान मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख खान निर्माता आहे तोही भूमिका करणार आहे.' हे ऐकताच मी लंडनमधून फ्लाईट प्रीपोन करुन भारताता आलो.

तो पुढे म्हणाला, "सिनेमात खूप मोठमोठी मंडळी होती. मी सर्वांना फक्त बघत होतो. माझी अगदी छोटी भूमिका होती. मग एकदा आम्हाला शूटसाठी तमिळनाडूला नेलं. तोपर्यंत मी वाट पाहत होतो की शाहरुख कधी येणार पण तो काही येईना. मग कळलं की तामिळनाडूला शाहरुख येणार आहे.एक दिवस हॉटेलच्या टेरेसवर बुफे होता. मी सुद्धा जेवायला टेरेसवर गेलो तर तिथे साक्षात शाहरुख खान अगदी साध्या खुर्चीत बसला होता. आजूबाजूला बॉडीगार्ड होते. मी पाहतच राहिलो. मी फक्त २०-२१ वर्षांचा होतो. त्यात शाहरुख दिसल्यावर मला एकदम भारी वाटलं. मी गर्लफ्रेंडला जी आता माझी बायको आहे तिला फोन लावून सांगितलं. ती म्हणाली जाऊन शाहरुखशी बोल. पण मला कळत नव्हतं कसं बोलू. मग एका कलाकाराने बॉडीगार्डला सांगितलं की याला शाहरुखला भेटायचं आहे. तर तो म्हणलाा, 'सर जरा कामात आहे मी सांगतो तेव्हा ये.' नंतर आम्ही सगळे हाऊसी खेळत होतो. त्या खेळात मी जिंकलो. सगळ्यात महाग हाऊसी ५५० रुपयांची होती. तेव्हा शाहरुखने मला ५५० दिले होते. लोकांनी टाळ्या वाजवल्या."

नंतर बाऊन्सरने  शाहरुखला भेटण्यासाठी मला बोलवलं. मी एकदम काय बोलायचं इंग्रजीत कसं बोलायचं याची तयारी करुन गेलो. जसं मी शाहरुखसमोर आलो मला शब्दच फुटेना. तिथेच मला रडायला आलं. मग शाहरुखनेच मला घट्ट मिठी मारली, गालावर किस केलं. काम कसं सुरु आहे, काही प्रॉब्लेम नाही ना, प्रोडक्शन टीम नीट काळजी घेतेय ना अशी त्यांनी चौकशी केली. हे ऐकून मी धन्यच झालो."

टॅग्स :अमेय वाघशाहरुख खानमराठी अभिनेताबॉलिवूड