मुंबई - ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या प्रसिद्ध शोमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैना यांच्यासह ४० जणांवर महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंदवून समन्स पाठवले आहेत. या घडामोडीनंतर आपण चॅनेलवरून शोचे सर्व भाग हटवल्याचे रैनाने रात्री उशिरा जाहीर केले. चौकशी निष्पक्षपणे व्हावी यासाठी मी सर्व एजन्सींना सहकार्य करेन, असेही त्याने स्पष्ट केले.
रणवीर अलाहाबादिया, कॉमेडियन समय रैना यांच्यासह अपूर्वा माखिजा, जसप्रित सिंग, आशिष चंचलानी यांच्यासह तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपक कलालसह सहभागी झालेल्या व्यक्तींनाही समन्स बजावले आहेत.
प्रेक्षकांना करणार साक्षीदारवाढता रोष लक्षात घेता महाराष्ट्र सायबर विभागानेदेखील याविरुद्ध रैना, रणवीरसह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ‘’इंडियाज गॉट लेटेंट’’च्या रणवीरच्या उपस्थितीत असलेल्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना यात आरोपी करत त्यांना समन्स बजाविण्यात येत आहे. लवकर या सर्वांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सायबर विभागाने सांगितले, तसेच प्रेक्षकांना यात साक्षीदार बनविणार असल्याचेही सायबर विभागाने सांगितले.
आसाम पोलिस मुंबईत ...याप्रकरणी आसाम पोलिसांनी पहिला गुन्हा नोंदवला आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी आसाम पोलिस मुंबईत दाखल झाले. त्यांनी, मुंबई पोलिसांकडे तपासासंबंधित चर्चा केली, तसेच काही जणांचे जबाबही घेण्यास सुरुवात केल्याचे समजते.
अपूर्वा मखिजाचा जबाबअपूर्वा मखिजा बुधवारी खार पोलिसांसमोर हजर झाली. तेथे तिचे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी नोंदवून तिला सोडून देण्यात आले. मंगळवारी, चंचलानीने आपल्या वकिलासह खार पोलिस स्टेशनला भेट दिली होती. समय रैना लवकरच चौकशीला सामोरा जाईल, असे त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आले. ज्यांनी शोची तिकिटे खरेदी केली आणि तो पाहिला त्यांच्या तपशीलासाठी पोलीस बुक माय शोशीही संपर्क साधणार आहेत.