Join us

पोलीस अधिकारी राकेश मारियांवर येतोय बायोपिक, रोहित शेट्टीचं दिग्दर्शन तर हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:23 IST

२६/११ मध्ये महत्वाची कामगिरी पार पडणारे पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्यावर बायोपिक येणार आहे (rohit shetty, rakesh maria)

रोहित शेट्टी त्याच्या कॉप युनिव्हर्ससाठी सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'सिंघम', 'सिंबा', 'सूर्यवंशी' आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन' सिनेमानिमित्ताने रोहितने बॉलिवूडमध्ये लोकप्रिय कलाकारांना घेऊन त्याचं कॉप युनिव्हर्स तयार केलंय. रोहित शेट्टी आता काल्पनिक कॉप युनिव्हर्समधून बाहेर येऊन खऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर बायोपिक बनवणार आहे. हे अधिकारी आहेत राकेश मारिया. सिनेमात राकेश मारियांची भूमिका कोण साकारणार? जाणून घ्या सर्वकाही

हा अभिनेता साकारणार राकेश मारिया?

२६/११ मध्ये पोलीस दलाकडून महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या राकेश मारिया यांच्यावर आता बायोपिक येतोय. अभिनेता जॉन अब्राहम या बायोपिकमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. अजून याविषयी रोहित शेट्टी किंवा त्याच्या टीमने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये. जॉन अब्राहमला राकेश मारियांच्या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत यात शंका नाही. राकेश मारियांनी १९८१ ते २०१७ या कार्यकाळात पोलीस दलात अनेक महत्वाच्या कामगिरी बजावून कुख्यात गुंडांना तुरुंगाआड केलं.

कधी सुरु होणार शूटिंग?

रोहित शेट्टी दिग्दर्शित राकेश मारियांच्या बायोपिक सिनेमाचं शूटिंग पुढील वर्षी अर्थात २०२५ ला सुरु होईल. सध्या या सिनेमाची तयारी प्राथमिक स्तरावर आहे. रोहित शेट्टींचा 'सिंघम अगेन' सिनेमा म्हणावा तसा चालला नाही. अजय देवगण, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर असे लोकप्रिय कलाकार असूनही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद  मिळाला. त्यामुळे आता कॉप युनिव्हर्सची वाट सोडून रोहित पहिल्यांदाच बायोपिक सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीराकेश मारियाजॉन अब्राहम