Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या 21 व्या वर्षी आदिती राव हैदरी अडकली होती लग्नच्या बेडीत, पण काही वर्षातच झाले विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 17:33 IST

ती १७ वर्षांची असताना त्यांची भेट झाली होती.

अदितीने २००९ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली 6’ मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती. २०१८ मध्ये आलेला ‘दासदेव’ हा तिचा बॉलिवूडमधला अखेरचा चित्रपट होता. सध्या ती बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम करताना दिसत आहे. तिच्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तिने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. तिने आतापर्यंत पद्मावत, रॉकस्टार, मर्डर ३, भूमी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

आदिती राव हैदरीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्याविषयी जाणून घ्यायची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. तुम्हाला माहीत आहे का, आदितीचे लग्न झालेले होते आणि लग्नाच्या काहीच वर्षांत तिने आणि तिच्या पतीने वेगळे व्हायचे ठरवले. आदितीचे लग्न एका अभिनेत्यासोबतच झाले होते. आदिती केवळ २१ वर्षांची असताना तिने सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले होते. सत्यदीपने नो वन किल्ड जेसिका या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो राधिका आपटेच्या फोबिया या चित्रपटात देखील झळकला होता. आदिती आणि सत्यदीप यांनी वेगळे व्हायचे का ठरवले याविषयी आदितीनेच एका मुलाखतीत सांगितले होते.

आदिती आणि सत्यदीप यांचे लग्न २००७ मध्ये झाले होते. त्यावेळी ती केवळ २१ वर्षांची होती. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आदितीने सांगितले होते की, मी २१ वर्षांची असताना सत्यदीपसोबत लग्न केले होते. तो वकील होता आणि त्याला अभिनयक्षेत्रात करियर करायचे होते. तो खूप चांगला कलाकार आहे. मी १७ वर्षांची असताना आमची भेट झाली होती आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो. आम्ही वेगळे झाल्यानंतर मला खूपच त्रास झाला होता. पण आजही आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. माझ्या कुटुंबियांसाठी किंवा त्याच्या कुटुंबियांसाठी आम्ही आजही तितकेच जवळचे आहोत.

आदितीने बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना तिच्या लग्नाविषयी आणि घटस्फोटाविषयी का लपवले होते याविषयी तिने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. ती म्हटली होती की, मला भूतकाळाविषयी बोलायला आवडत नाही. त्यामुळे मी आमच्या नात्याविषयी न बोलणेच पसंत करत होते. तसेच मला माझ्या खाजगी आयुष्याविषयी चर्चा करायला आवडत नाही.

टॅग्स :आदिती राव हैदरी