Join us
Daily Top 2Weekly Top 5

उषा नाडकर्णींचा चाहत्याने न विचारताच काढला फोटो, आऊनी सांगितले एकापेक्षा एक भन्नाट किस्से.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 14:57 IST

हे तर काहीच नाय! म्हणत उषा नाडकर्णीं (Usha Nadkarni)नी संपूर्ण मंच दणाणून सोडला.

अभिनेत्री उषा नाडकर्णी  (Usha Nadkarni) उर्फ आऊ म्हणजे संपूर्ण मनोरंजन सृष्टीतील सगळ्या कलाकारांच्या जवळची आणि हक्काची व्यक्ती, पण ती कधी काय बोलेल याचा नेम नाही. आऊ यांनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. त्यांना प्रेक्षकांनी अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे पण कधी विचार केला का कि आऊ कॅफे मध्ये येऊन स्टॅन्ड-अप ऍक्ट परफॉर्म करतील. हो हे खरं आहे. झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हे तर काहीच नाय या कार्यक्रमाच्या आगामी भागात आऊ म्हणजेच अभिनेत्री उषा नाडकर्णी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत.

आऊ यांचे एक एक किस्से देखील तितकेच मजेदार आहेत. इतक्या वर्षांच्या अनुभवातील मजेदार किस्स्यांच्या पिटारा देखील तितकाच मोठा आहे. आगामी भागात हे तर काहीच नाय! म्हणत उषा नाडकर्णींनी संपूर्ण मंच दणाणून सोडला, किस्स्यांवर किस्से ऐकून सिद्धार्थ जाधव सह सर्वजण हसून हसून लोटपोट झाले. एकदा एका चाहत्याने आऊंचा फोटो त्यांना न विचारता काढला, तसंच एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर एका चाहत्याने बॅकस्टेज येऊन एक अतरंगी प्रश्न विचारला. त्यावर आऊंची प्रतिक्रिया काय होती आणि तो किस्सा नक्की काय होता हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. आऊंसोबतच या आठवड्यात मंचावर हजेरी लावणार आहेत पुष्कर श्रोत्री, किशोरी शहाणे-वीज, सुनील पाल, दीपक देशपांडे, आणि हास्यसम्राट फेम जॉनी रावत.     

टॅग्स :उषा नाडकर्णी