Usha Nadkarni: आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून त्यांना ओळखलं जातं. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्या महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाल्या. तर 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या. एक मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. सध्या त्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity Masterchef) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या रडताना दिसत आहेत.
'लाफ्टर शेफ'च्या धर्तीवरच हा नवा शो आहे. फराह खान, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार हे शोमध्ये परीक्षक आहेत. नुकतंच या शोचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. ज्यात 'फेस्टिव्हल' या थीमनुसार प्रत्येक स्पर्धकाला स्पेशल डिश बनवण्यास सांगतीलं. तर उषाताई मोदक बनवण्याची तयारी करतात. त्यानंतर शेफ विकास खन्ना यांच्याशी बोलताना त्या धाकट्या भावाची आठवण काढतात. उषाताई म्हणाल्या, "काम करत असताना आपल्या आई व भावाने मुलाला सांभाळलं. तो माझ्यापेक्षा लहान होता. तोच माझं आयुष्य होता, पण त्याचेही गेल्या जूनमध्ये निधन झाले. काही महिन्यापूर्वी तो सोडून गेला, मला त्याची खूप आठवण येते", असं म्हणत उषाताई रडू लागल्या. उषाताई यांना रडताना पाहून शेफ विकास यांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. शेफ विकास यांनीही त्यांच्या बहिणीचं निधन झाल्यानंतर दिवाळीला एकटेपणा जाणवल्याचं सांगितलं.
उषा नाडकर्णी यांचे धाकटे बंधू मंगेश कलबाग यांचं गेल्यावर्षी २० जून रोजी निधन झालं होतं. एक धाकटा भाऊ मंगेश हा उषा यांचा मोठा आधार होता, त्यांचा सोबती होता. आधीच दोन भावंडं गमावल्याने उषा आणि मंगेश यांच्यातील नाते अत्यंत अतूट आणि हळवे होते. आयुष्यातली अनेक सुख दुःख या बहीण भावांनी एकत्र पाहिली आहेत. उषा ताईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात भाऊ मंगेश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिले. अगदी आजही म्हणजे वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांना भावाचा मोठा पाठिंबा आणि आधार वाटत होता. पण, लाडक्या भावाला गमवण्याचं हे दुःख त्यांच्यासाठी इतके मोठे आहे की भावाला जाऊन आता एक काही महिन्यांत एक वर्ष होईल, तरी त्या अद्याप सावरलेल्या नाहीत.