अभिनेत्री उपासना सिंग(Upasana Singh)ने तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या मावशीची भूमिका साकारून सगळ्यांना हसवणाऱ्या उपासना सिंगने कास्टिंग काउचपासून स्वतःला कसे वाचवले हे सांगितले. उपासना सिंगने अनेक बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज ती निर्मातीही आहे.
उपासना सिंग म्हणाली की, एका साऊथच्या दिग्दर्शकाने मला अनिल कपूरसोबत एका चित्रपटात साइन केले होते. मी जेव्हा कधी दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा माझ्या आईला किंवा बहिणीला सोबत घेऊन जायचे. एके दिवशी त्याने मला विचारले की मी नेहमी कोणाला तरी सोबत का आणते. त्याने रात्री ११.३० वाजता मला फोन करून हॉटेलमध्ये बसण्यास सांगितले. मी दुसऱ्या दिवशी कथा ऐकेन. तिथे पोहोचण्यासाठी माझ्याकडे गाडी नाही, असे मी सांगितले. मग तो म्हणाला, नाही. तुला बसण्याचा अर्थ कळला नाही?
बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार, उपासना म्हणाली की, ''मग माझे सरदारनीवाले डोके सटकले. त्यांचे ऑफिस वांद्रे येथे होते, मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेले. त्यावेळी तो तिथे तीन-चार जणांसोबत मिटिंग घेत होता. त्याच्या सेक्रेटरीने मला थांबायला सांगितले पण मी सरळ आत गेले. लोकांसमोर मी पाच मिनिटे पंजाबी भाषेत शिवीगाळ केली. पण तिथल्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर मला आठवतंय की मी अनिल कपूरसोबत चित्रपट साईन केल्याचे अनेकांना सांगितले होते. फुटपाथवरून चालताना माझे अश्रू थांबत नव्हते.''
या घटनेचा काय परिणाम झाला?या घटनेच्या परिणामाबद्दल बोलताना उपासना म्हणाली की, ''या घटनेनंतर मी सात दिवस माझ्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. मी नॉनस्टॉप रडत राहिले. मी लोकांना काय सांगू याचा विचार करायचे. पण त्या सात दिवसांनी मला बळ दिले. त्यावेळी आईने मला खूप साथ दिली. मी माझ्या आईबद्दल विचार केला आणि ठरवले की मी सिनेइंडस्ट्री कधीही सोडणार नाही.''