नवी दिल्ली : ‘दंगल’ चित्रपटात कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर (१९) हिचा दुर्मीळ आजारामुळे मृत्यू झाला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
सुहानीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. 'दंगल'साठी २५ हजार मुलींमधून तिची निवड झाली होती. त्यात तिने आमिर खानच्या धाकट्या मुलीची (ज्युनियर बबीता फोगाट) भूमिका साकारली होती. मध्यंतरी ती काही जाहिरातींमध्येही दिसली होती.
सध्या ती मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. त्यासाठी तिने कामातून ब्रेकही घेतला होता. शिक्षण पूर्ण करून तिला चित्रपटात काम करायचे होते, असे तिच्या आईने सांगितले.
सुहानीला नेमके काय झाले होते?
nकाही दिवसांपूर्वी सुहानी अपघातात जखमी झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या शरिरावर सूज वाढत गेली. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला, मात्र अचूक निदान होईना. सुमारे दोन महिने तिच्या अंगावर सूज होती.
nमागील आठवड्यात तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केलेल्या चाचण्यांमध्ये 'डर्माटोमायोसिटिस' या दुर्मीळ आजार सुहानीला झाल्याचे निदान झाले. यावर स्टेरॉइड हाच उपचार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
nस्टेरॉइडचे उपचारही सुरू करण्यात आले. परंतु त्याचा दुष्परिणाम म्हणून सुहानीची रोगप्रतिकारशक्ती कमालीची घसरली. फुफ्फुस कमकुवत झाले आणि हळूहळू फुफ्फुसात संसर्ग होऊन त्यात पाणी भरले. शेवटच्या टप्प्यात प्रकृती इतकी गंभीर झाली की तिला श्वास घेणेही अवघड झाले. अखेर शुक्रवारी सुहानीने अखेरचा श्वास घेतला.