'बिग बॉस १८' काहीच दिवसांपूर्वी संपला. सलमान खानने पुन्हा एकदा त्याच्या खास सूत्रसंचालन शैलीत 'बिग बॉस १८' गाजवलं. करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता ठरला. अनेक चाहते आणि सामान्य जनतेला करणवीर मेहरा विजेता म्हणून इतका पटला नाही. रजत दलाल, विवियन डीसेना या दोघांपैकी एक 'बिग बॉस १८'चा विजेता म्हणून लायक होता, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत. अशातच 'बिग बॉस'ची माजी विजेती शिल्पा शिंदेने याच गोष्टीवरुन 'बिग बॉस १८'च्या मेकर्सना धारेवर धरलं आहे.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, "मेकर्स स्वतःच विजेते ठरवतात, हे लोकांना एव्हाना कळलंय. स्वतःच्या घरुन एखाद्याला आणून त्यालाच विजेता करुन त्यालाच दाखवण्यात येतं. चॅनलची जी काही स्ट्रॅटेजी असेल ती आता लोकांना कळाली आहे. तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत लोकांना मूर्ख बनवू शकता पण त्यानंतर नाही. लोक तेवढी हुशार नक्कीच आहेत."
अशाप्रकारे शिल्पा शिंदे 'बिग बॉस १८'च्या मेकर्सवर संतापली आहे. शिल्पा शिंदेने २०१७ साली आलेल्या 'बिग बॉस ११' चं विजेतेपद पटकावलं होतं. याशिवाय शिल्पा आणि 'बिग बॉस १८'चा विजेता करणवीर मेहरा या दोघांनी 'खतरो के खिलाडी १४'मध्ये सहभाग घेतला होता. 'खतरो के खिलाडी १४'चं विजेतेपदही करणवीर मेहराने पटकावलं होतं. शिल्पा शिंदे 'बिग बॉस' शोबद्दल सातत्याने तिचं मत व्यक्त करत असते.