Join us

Exclusive: वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री; सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या नायरा बॅनर्जीचा थक्क करणारा प्रवास 

By सुजित शिर्के | Updated: April 8, 2025 16:14 IST

वकिलीचं शिक्षण ते थेट अभिनय क्षेत्रात एन्ट्री; सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या नायरा बॅनर्जीचा थक्क करणारा प्रवास

अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) ही हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'खतरों के खिलाडी','बिग बॉस-18' यांसारख्या कार्यक्रमांमुळे ती नावारूपाला आली. तमिळ, तेलुगू चित्रपटांधून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीतच लोकप्रियतेच शिखर गाठलं. नायरा बॅनर्जीने 'वन नाइट स्टँड' आणि 'कमाल धमाल-मालामाल' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये देखील तिने काम केलं आहे. नुकताच अभिनेत्रीने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. त्यादरम्यान, नायराने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास तसंच अनेक गोष्टींचा उलगडा केला.

>>> सुजित शिर्के 

नायरा बॅनर्जी अभिनय क्षेत्राकडे कशी वळली, हा निर्णय कधी घेतला? 

मी मुंबईत लहानाची मोठी झाले आहे. माझा जन्म हा मुंबईतच झाला आहे. वकिलीचं शिक्षण घेतानाच मला साउथ चित्रपटामध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली. त्यादरम्यान, कॉलेजमध्ये मी फॅशन शो देखील करायचे, तेव्हा एका सेलिब्रिटी मॅनेजरने मला पाहिलं आणि त्यांनी मला म्हटलं की, 'तुझा चेहरा एकूणच शरीरयष्टी अभिनेत्रींप्रमाणेच आहे.' मग त्यावेळी मला करिअरमधील पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली. यावर माझ्या घरामध्ये प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर मी मग माझ्या करिअरमधील पहिल्या साऊथ चित्रपटामध्ये काम केलं. मला या क्षेत्रात येण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. कारण, मला अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मी याबद्दल  कधी विचार केला नव्हता.या गोष्टी नशीबाने घडत गेल्या. मग काम करत असताना मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि मग पुढे याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं.मग पॅशन प्रोफेशन बनलं.

वकिलीचं शिक्षण घेऊन फिल्म इंडस्ट्रीत यायचं ठरवलं, यावर कुटुंबीयांची काय रिअ‍ॅक्शन होती?  माझ्या घरच्यांनी मला कायम पाठिंबा  दिला. ज्यावेळी मला साऊथ चित्रपटाची ऑफर आली त्यावेळी ते मला म्हणाले की,'हा ठीक आहे, तुला तुझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे तो पूर्णपणे तुझा निर्णय असेल. पण,हे सगळं शिक्षण पूर्ण केल्यानंतरच कर असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं.' असं करता करता मी जवळपास १२ चित्रपटांमध्ये काम केलं. 'एक्स्क्यूझमी मॅडम'एक वेब सीरिज होती,'वन नाईट स्टॅ्ंड'आणि 'मालामाल'हे बॉलिवूड चित्रपट होते. यामधील 'मालामाल' हा माझा पहिला हिंदी सिनेमा होता, त्यामध्ये प्रियदर्शन सरांनी मला लॉन्च केलं होतं.

तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये तू काम केलं आहेस,तर तुझा काम करण्याचा अनुभव कसा होता ? 

तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव फारच छान होता. मला त्यातून खूप काही शिकता आलं. आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करता येतं आणि तिथे प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते.प्रत्येक ठिकाणची भाषा, संस्कृती वेगळी असते, हा अनुभव खरंच चांगला आहे. साउथमध्ये तुम्ही जास्त काम करु शकता, कारण तिथे वेळेला खूप महत्व दिलं जातं आणि बॉलिवूडमध्ये सगळं काही आरामात असतं.

कधी रिजेक्शनचा सामना केला आहे का? 

मला बऱ्याच वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. मी नेहमी टॉपपर्यंत पोहोचली आहे, म्हणजे  ही फायनल स्टेज असते. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करत असताना तु्म्हाला अचानक सांगितलं जातं की, दुसरं कोणालातरी कास्ट करण्यात आलं आहे. त्यांच्या खास माणसाला ती ऑफर दिली जाते. असे बरेच किस्से माझ्यासोबत घडले आहेत.

'बिग बॉस'मुळे फेम मिळाला,यामागे काय कारण आहे? तुला काय वाटतं?

'बिग बॉस'मुळे मला फेम मिळाला असं काही नाही. कारण,लोकं मला त्याआधीपासूनच ओळखतात. खरंतर मी 'बिग बॉस'मध्ये जास्त दिवस राहिले सुद्धा नव्हते. मी फक्त तीन आठवडे त्या घरामध्ये  होते. तर मला असा काही फरक जाणवला नाही, हा पण त्यामुळे आपलं महत्व थोडं वाढतं, हे खरं आहे.

इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचे अनेक प्रकार समोर येतात, तुला असा काही अनुभव आलाय का? 

जोपर्यंत तु्म्ही स्वत:च्या डोळ्यांनी या गोष्टी पाहत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काहीत माहीत नसतं. म्हणजे मला तरी कधीच कास्टिंग काऊचचा अनुभव आलेला नाही.

नायराचा अपकमिंग प्रोजेक्ट कोणता आहे?

मी सध्या एका नाटकामध्ये काम करते आहे, 'अकबर-बिरबल' असं त्याचं नाव आहे. त्यामध्ये मी अनाकरलीची भूमिका साकारते आहे. शिवाय अजूनही काही प्रोजेक्ट्स आहेत. त्याबद्दल बोलणं सुरु आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा