Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाल संभाजींच्या उपस्थितीत अभिनेता विकी कौशलने स्वीकारला पुरस्कार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार’ प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:22 IST

अभिनेता विकी कौशल यांना यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले. 

मुंबई : छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत त्यांचे शौर्य, अतूट निष्ठा याचे पडद्यावर अंगावर रोमांच आणणारे दर्शन घडविणाऱ्या अभिनेता विकी कौशल यांना यंदाच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ - सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले. 

विकी कौशल यांचे पुरस्कारासाठी नाव जाहीर होताच ढोल आणि झांजच्या निनादात छोटे छत्रपती संभाजी महाराज अर्थात छावा रूपातील मुलांनी त्यांना जोशपूर्ण वातावरणात मंचावर आणले. कौशल यांनी मंचाला विनम्रपणे नमस्कार केला. यावेळी गेट वे ऑफ इंडिया परिसरातील वातावरण भारलेले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला जणू सर्वजण वंदन करत होते. पुरस्कार स्वीकारताना कौशल यांनी मराठीत भावना व्यक्त करत आश्चर्याचा धक्का दिला. कौशल यांनी सर्वप्रथम ‘हर हर महादेव’चा जयघोष करताच वातावरणात चैतन्य अवतरले. 

सर्वांना माझा नमस्कार... माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. धन्यवाद लोकमत या सन्मानासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार. माझ्यासाठी हा फक्त पुरस्कार नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या लोकांचा आशीर्वाद आहे.     - विकी कौशल, अभिनेता  

मुख्यमंत्र्यांनी दिली शौर्य गर्जनेला साथ : भाषणाच्या शेवटी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत, ‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था’ असे म्हणताच ‘महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास साथ दिली.

नवी मुंबईतील कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी छोटे छत्रपती संभाजी महाराज अर्थात छावाच्या वेशभूषेत आले होते. त्यांचे उजळलेले चेहरे संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि बलिदान यांची गाथाच जणू सांगत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vicky Kaushal Honored with Award in Presence of Child Sambhaji

Web Summary : Vicky Kaushal, portraying Chhatrapati Sambhaji Maharaj, received the 'Lokmat Maharashtrian of the Year' award. Amidst drumming and lively atmosphere, he expressed gratitude in Marathi, acknowledging Maharashtra's culture and history. Chief Minister Fadnavis joined in praising Sambhaji Maharaj's valor. Children dressed as Sambhaji Maharaj attended, embodying his legacy.
टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026विकी कौशल