मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर एका अज्ञाताने चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराच्या तपासासाठी १५ पथके बनवली आहे. सध्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी या घटनेवर वेगळीच शंका उपस्थित केला आहे. इतकी सुरक्षा व्यवस्था असतानाही अशाप्रकारे सैफवर हल्ला होतोय यामागे नेमका हेतू काय, सैफच्या हत्येचा प्रयत्न होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रजा मुराद म्हणाले की, जोपर्यंत या घटनेतील आरोपी सापडत नाही तोवर काही सत्य बाहेर येणार नाही. मुंबई पोलीस आरोपीला पकडण्यास सक्षम आहे. फिल्म निर्माते मुकेश दुग्गल यांची हत्या झाली होती. राजीव राय यांच्यावर हल्ला झाला होता. राकेश रोशन यांच्यावर गोळी चालली होती. खंडणीच्या मागण्या होत राहतात. अनेक गोष्टी बाहेर येत नाहीत. जर तुम्हाला जीवाचा धोका असेल तर पोलिसांकडे न जाता शांतता खरेदी केली जाते. यासारख्या घटना गंभीर आहेत. चोरी करणाऱ्याचं मन छोटं असते, चोरी करून पळणे हा त्याचा हेतू असतो. चोरी करताना पकडला तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हल्ला करत नाही. ज्यारितीने झटापट झाली, ६ चाकू वार केलेत. त्यामुळे कदाचित त्याचा हेतू हत्येचा असावा असंही असेल असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय जर हत्येचा हेतू असेल तर त्यामागे कोण आहे? कोणाला हे हवे हे सर्वकाही तपासात समोर येईल. ही समस्या केवळ सिनेमातील लोकांची नाही. प्रत्येक देशवासियांना सुरक्षा हवी. जीवाला धोका असणाऱ्या त्यांना नको. या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. सैफ अली जीवघेणा हल्ल्यातून वाचला. कदाचित दुसरा कुणी असता तर वाचला नसता. त्यामुळे ही चोरी होती की चोरीच्या बहाण्याने हत्या करण्याचा त्याचा हेतू होता? तो घरात कसा घुसला, आत गेला कसा हे सर्व तपासात समोर यायला हवं असं अभिनेते रजा मुराद यांनी म्हटलं.
दरम्यान, इतका भयंकर हल्ला झाला, सहजपणे घरात घुसून हल्ला कसा झाला याच्या मुळाशी पोहचणे गरजेचे आहे. घटना घडत असतात परंतु त्या समोर येत नाहीत. खंडणी मागितली जाते, दहशतीत कुणाला जगायला आवडते. जिथे गोळी चालते, कुणी घरात घुसून मारण्याचा प्रयत्न करतो, रस्त्यावर गोळी मारतो तेव्हा हे सार्वजनिक होते. त्यामुळे या घटनेच्या खोलाशी जाऊन चौकशी व्हायला हवी आणि यात जे कुणी दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असंही रजा मुराद यांनी सांगितले.