Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी..", लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार क्षितीशची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:35 IST

आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे, लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहे. टिळकांचं राष्ट्रप्रेम, त्यांचं करारी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं आहे. त्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे.आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ही मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. आपल्या भेटीस येत आहे.

या मालिकेत लोकमान्य टिकळांची भूमिका साकारणार क्षितीश दाते म्हणाला की, ही व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक आहे. ह्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ही अशी भूमिका मी पहिल्यांदाच करत आहे. लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला एवढंच माहित असतं की ते अतिशय कडक आणि शिस्तप्रिय होते. पण त्याशिवाय त्यांचे त्यांच्या पत्नीशी असलेलं नातं कसं होतं, विद्यार्थ्यांशी असलेलं नातं, समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या पिढीतले त्यांचे जे आदर्श होते त्यांच्याबरोबरचं त्यांचं नातं, याबद्दल मला नव्याने खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल वाचायला मिळालं. मालिकेच्या निमित्ताने पुन्हा मुळापासून वाचन झालं. ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी आहे.'' 

टॅग्स :झी मराठीसेलिब्रिटीलोकमान्य टिळक