Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आमीर खाननं 'संजू' नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:21 IST

संजू चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होणार आहे

मुंबई: राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूरनं मुख्य भूमिका साकारलेला हा चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी अभिनेता आमीर खानला विचारण्यात आलं होतं. मात्र त्यानं नकार दिला, अशी चर्चा चित्रपट वर्तुळात होती. यावर प्रथमच आमीर खाननं भाष्य केलं आहे. संजू चित्रपटाची ऑफर का नाकारली, याचं कारण आमीरनं सांगितलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना आमीरनं संजूमधील भूमिका नाकारण्यामागील कारण सांगितलं. 'तो (राजकुमार हिरानी) माझ्याकडे चित्रपटाची कथा घेऊन माझ्याकडे आला होता. त्यानं ती कथा मला वाचून दाखवली. मला ती अतिशय आवडली. मी या चित्रपटात दत्त साहेबांची भूमिका साकारावी, असं त्याला वाटत होतं. ती भूमिका अतिशय उत्तम होती. वडिल आणि मुलाचं नातं त्या कथेत अतिशय सुंदरपणे उलगडताना दाखवण्यात आलं होतं,' असं आमीरनं पत्रकारांना सांगितलं. 'एक अभिनेता म्हणून मला संजय दत्तची भूमिका साकारायला आवडेल, असं मी राजू हिरानीला सांगितलं. कारण ती भूमिका मला सर्वाधिक भावली होती. या चित्रपटात भूमिका करायची असल्यास, मी केवळ संजय दत्तची भूमिका साकारेन, असं मी राजूला म्हटलं,' असं आमीरनं पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. संजय दत्तची भूमिका आधीच रणबीर कपूरला देण्यात आल्यानं मी हा चित्रपट नाकारला, असं आमीरनं पुढे सांगितलं. रणबीर हा अतिशय सक्षम अभिनेता असून त्यानं संजय दत्तची भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली आहे, असे कौतुकाद्गारदेखील आमीरनं काढले. 

टॅग्स :आमिर खान