Join us

पाकिस्तानी क्रिकेटरमुळं लग्नाच्या आनंदावर पडलं होतं विरजण, आमिरनं शेअर केला खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:14 IST

आमिर खानने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटूमुळे रीना दत्तासोबतच्या लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं होतं.

Aamir Khan Reena Dutta Marriage Story: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २० जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. आमिरनं चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अनेक मुलाखती दिल्या आहेत. ज्यात त्याने आपल्या खासगी आयुष्यातील काही अनपेक्षित पैलूंवर प्रकाश टाकला आहे. विशेषतः त्याने पहिली पत्नी रीना दत्ता हिच्याशी झालेल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देताना, त्या दिवशी घडलेल्या एका खास 'क्रिकेट' प्रसंगाचाही उल्लेख केला. ज्यामुळं त्याच्या लग्नाच्या आनंदावर अक्षरशः विरजण पडलं होतं. 

नुकतंच द लल्लंटॉपशी बोलताना आमिर खान म्हणाला, "ही १९८६ ची गोष्ट आहे. मी २० वर्षांचा होतो. सगळं खूप लवकर घडत होतं. आमच्या प्रेमाबद्दल घरी माहिती झालं होतं. गृहनिर्माण भवन ही एक इमारत आहे. तिथे विवाह नोंदणी कार्यालय आहे. त्यांचा फॉर्म आणण्यापूर्वी मी स्पेशल मॅरेज अॅक्ट वाचला. १४ मार्च रोजी मी २१ वर्षांचा झाल्यावर मी १५ मार्च रोजी लग्नाची नोटीस दिली. ती नोटीस १५ एप्रिल रोजी मॅच्युअर झाली. १६-१७ एप्रिल रोजी वीकेंड होता. १८ एप्रिल रोजी आमचं लग्न झालं". पण, लग्नाचा दिवस आमिरसाठी जितका खास असायला हवा होता, तितकाच अनपेक्षित ठरला. कारण त्या दिवशीच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होता.

आमिर म्हणाला, "लग्न करून आम्ही दोघंही आपापल्या घरी गेलो. थोडं टेन्शन होतं. घरचे विचारतील की कुठे होतात, तर काय सांगायचं? पण कोणीच काही विचारलं नाही. सगळे सामन्यात एवढे गुंतले होते की आमच्या अनुपस्थितीचं कोणालाही भान नव्हतं. मीही मॅच पाहायला बसलो. भारत सामना जिंकत होता. मनात एक खास भावना होती, आज लग्न झालं, भारत पाकिस्तानला हरवेल, म्हणजे हा दिवस कायम लक्षात राहील. पण शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादनं षटकार ठोकला आणि माझा सगळा मूड खराब झाला. मी फारच निराश झालो".

यासोबतच आमिरने जावेद मियांदादसोबतच्या भेटीचा एक किस्सा शेअर केला.  "लग्नाच्या काही दिवसांनी मी फ्लाइटमध्ये जावेद मियांदादला भेटलो. मी त्याला म्हटलं, "जावेद भाई, तुम्ही बरोबर केलं नाही. तुम्ही माझ्या लग्नाच्या आनंदावर विरजण टाकलं. त्याच दिवशी षटकार मारलात आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो".

रीना दत्ता आणि आमिर खान यांची ओळख १९८५ साली झाली होती. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १९८६ मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केलं. त्यांचं हे नातं तब्बल १६ वर्ष टिकलं आणि २००२ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. मात्र दोघं आजही सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटतात. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'सितारे जमीन पर'नंतर आमिर खान लवकरच रजनीकांतसोबत 'कुली' या चित्रपटात झळकणार आहे. त्यानंतर तो दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम करणार असून हा चित्रपट राजकुमार हिरानी दिग्दर्शित करणार आहेत.

टॅग्स :आमिर खान