बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. हत्या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देत संतोष देशमुख यांनी न्याय मिळवून द्यावा यासाठी मागणी होत आहे. देशमुख कुटुंबीय यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नुकतंच आमिर खानने (Aamir Khan) देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.
पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खानने देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी आमिरची एक्स पत्नी किरण रावही उपस्थित होती. आमिर आणि किरणने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची विचारपूस करत त्यांच्याशी चर्चा केली. किरण रावने त्यांना "तुम्ही धीर सोडू नका" असं म्हणत आधार दिला. तर संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याला आमिरने मायेने जवळ घेत त्याला मिठी मारली.