Join us

आमच्या 'ही'चं प्रकरण या खास विनोदी नाटकाचा या दिवशी होणार विनामूल्य प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 08:00 IST

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुट्टी देणारं, सगळे ताणतणाव विसरून तुम्हाला खळखळून हसवणारं असं हे आमच्या 'ही'चं प्रकरण नाटक आहे.

ठळक मुद्देदादर सांस्कृतिक मंचच्या दुसर्‍या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि ‘मुंबई बीट्स’ या संस्थेच्या सहकार्याने दिनांक १२ एप्रिल २०१९ला संध्याकाळी ६.३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर येथे आमच्या 'ही'चं प्रकरण हे नाटक आयोजित करण्यात आले आहे.

दादर सांस्कृतिक मंचच्या दुसर्‍या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि ‘मुंबई बीट्स’ या संस्थेच्या सहकार्याने दिनांक १२ एप्रिल २०१९ला संध्याकाळी ६.३० वाजता, रविंद्र नाट्य मंदिर येथे एक नाटक आयोजित करण्यात आले आहे. निखिल रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर, आनंद काळे, मयुरेश खोले, प्रियदर्शनी इंदलकर यांचं आमच्या 'ही'चं प्रकरण या खास विनोदी नाटकाचा प्रयोग रसिकांसाठी या दिवशी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.

दादर मधील सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी, विविध संकल्पना साकारण्यासाठी तसेच दादर प्रेमी मंडळीना एकत्र आणण्यासाठी दादर सांस्कृतिक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून महिला, पुरुष, तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यात सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा विषयक असे सर्व प्रकारचे कार्यक्रम समाविष्ट असतात.

मराठी माणूस हा खऱ्या अर्थाने नाटकवेडा प्रेक्षक... म्हणूनच महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची खूप मोठी परंपरा लाभली आहे. नाटक आणि रंगभूमी म्हणजे मराठी माणसाच्या मनाचे हळवे कोपरे. पण हल्ली म्हणावे तितके प्रेक्षक नाटकांना हजेरी लावत नाहीत. हेच चित्र बदलण्यासाठी, खारीचा वाटा म्हणून दादर सांस्कृतिक मंचाने ‘आमच्या ‘ही’चं प्रकरण’ या नाटकाचा प्रयोग विनामूल्य आयोजित केला आहे. विशेष म्हणजे ‘मुंबई बीट्स’ या संस्थेच्या सहकार्याने कलाक्षेत्रातील मान्यवरांना कलारंजन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यावर्षी ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून सुट्टी देणारं, सगळे ताणतणाव विसरून तुम्हाला खळखळून हसवणारं असं हे धम्माल नाटक बघायला सर्व नाट्य रसिकांनी नक्कीच गर्दी करावी आणि या सुवर्ण संधीचा हमखास लाभ घ्यावा असं आवाहन दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्षा उत्तरा मोने यांनी केलं आहे. नाटकाच्या विनामूल्य प्रवेशिका, नाटकाच्या दोन तास आधी नाट्यगृहाबाहेर उपलब्ध करण्यात येतील.

टॅग्स :भार्गवी चिरमुले