कपूर कुटुंबातील रणबीर-करीनाचा चुलत भाऊ आदर जैन (Aadar Jain) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत त्याने लग्न केलं. याआधी आदर जैन अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. विशेष म्हणजे तारा आणि अलेखा बेस्ट फ्रेंड्स होत्या. आदरने अलेखासोबत लग्नसोहळ्यातच चार वर्ष मी टाईमपास केला असं वक्तव्य केलं होतं. यावरुन तो खूप ट्रोल झाला होता. आता त्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आदर जैन म्हणाला, "मी चार वर्ष नाही तर २० वर्ष टाईमपास केला असं म्हणालो होतो. माझ्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. फॅक्ट चेक न करता आरोप लावले जात आहेत. दुर्दैवाने लोक खोट्या गोष्टी पसरवतात पण यामुळे तो व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबावरही परिणाम होतो हे कोणीच बघत नाही. माझ्याबाबतीत पहिल्या दिवसापासून बऱ्याच गोष्टी छापल्या गेल्या. आम्ही शांत राहणं पसंत केलं. बोलायला मिळतंय म्हणून लोक बोलत सुटतात. पण मी, माझी बायको अलेखा आणि तारा आमच्यावर आणि आमच्यावर कुटुंबावर होणारा हा अन्याय आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नाही."
नक्की काय म्हणाला होता आदर जैन?
आदर जैन लग्नात अलेखासाठी प्रेमाचे शब्द बोलताना म्हणाला, "मी नेहमीच अलेखावर प्रेम केलं आणि मला तिच्यासोबतच राहायचं होतं. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. मी आयुष्यात २० वर्ष टाईमपास केला. आता माझं सर्वात सुंदर मुलीशी लग्न झालं आहे. अलेखासोबत लग्न करायला इतकी वर्ष वाट पाहावी लागली."