Senior Actor Makarand Anaspure Reaction On Reservation Issue In Maharashtra: आताच्या घडीला आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन गणपतीत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. यानंतर सरकारने जीआर काढले आणि काही मागण्या मान्य केल्या. या जीआरविरोधात आता ओबीसी समाज एकवटला आहे. यातच बंजारा समाज आरक्षणावरून आंदोलन करत आहे. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना धार चढत असतानाच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलत असताना मकरंद अनासपुरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाण्याची चळवळ आम्ही केवळ चालवली. नाही तर त्याचा दशकपूर्ती सोहळा साजरा केला आहे. यंदा पाऊस जास्त झाला, निसर्गाचा अंदाज कोणालाही येत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने जास्तीत जास्त मदत करावी, असे कळकळीचे आवाहन आहे. त्यांनी त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवातही केली आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मकरंद अनासपुरे यांनी नमूद केले.
शासनाने भरीव तरतूद शेतकरी बांधवांसाठी केली पाहिजे
प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी भूमिका आम्ही गेल्या दशकभरापासून मांडत आहोत. याच भूमिकेचा पुनरुल्लेख मी करेन. यंदाचा पाऊस थोडा जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे उभे पीक बुडालेले दिसत आहे. या खरीपाच्या हंगामात हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती सगळ्यांसमोर आहे. यात शासनाने भरीव तरतूद शेतकरी बांधवांसाठी केली पाहिजे, अशी अपेक्षाही मकरंद अनासपुरे यांनी बोलून दाखवली.
... तोपर्यंत आपल्याला तोडणे फारसे शक्य नाही
मला असे वाटते की, समाज तुटू नये. समाज तुटला तर त्यातून अराजक निर्माण होते. मला असे वाटते की, आपण भावंडांसारखे राहतो. समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा आपण एकत्रित धावून जातो. तर ती एक मुळीची गोष्ट आणि एका लाकडाची गोष्ट आपणा सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत आपण मुळीच्या अवस्थेत आहोत, तोपर्यंत आपल्याला तोडणे फारसे शक्य नाही. पण आपण वेगवेगळी लाकडे होत गेलो, तर तोडणे फार सहज सोपे होईल. माझी एकच कळकळीची विनंती आहे की, हा एकोपा, जी आपली गावकी-भावकी एकत्र होती, ती तशीच टिकून राहावी, असे मनापासून वाटते, असे मकरंद अनासपुरे यांनी म्हटले आहे.
राजकीय लोकांना सल्ले द्यावेत, एवढे आम्ही मोठे नाही
राजकीय नेते मांडत असलेल्या भूमिकांबाबत मकरंद अनासपुरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलेले बरे राहील. कारण प्रत्येकाची भूमिका सापेक्ष आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, गावकी-भावकी एकत्र राहिली पाहिजे. कारण आमचा गाव आणि आमचा ग्रामीण भाग, एकत्र राहिला, एकसंध राहिला, तर त्यातून प्रगती आहे, त्यातून आनंद आहे, त्यातून परमार्थ आहे. राजकीय लोकांना सल्ले द्यावेत, एवढे आम्ही मोठे नाही आणि त्या क्षेत्रातीलही नाही, असे मकरंद अनासपुरे म्हणाले.
दरम्यान, नागरिक म्हणून तुमची जी भावना आहे, ती माझीही भावना आहे. आपल्यातील एकोपा आपण टिकवून ठेवावा, कारण आता निसर्गही कोपत चालला आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारताच, राजकीय क्षेत्रात मी कार्यरत नसल्यामुळे राजकीय भाष्य करणार नाही. इतर प्रश्न जे मला उमजतील, ज्याचे मला आकलन होईल, ज्याचे मला थोडे अल्प ज्ञान आहे, अशा मुद्द्यांवरच मी बोलेन. राजकीय लोक काय बोलतात, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कलावंत मंडळी आहोत. आम्हाला मनपासून जे वाटते, ते आम्ही करत आहोत. कलेची सेवा करत आहोत. त्यामुळे भाष्यांमध्ये पडण्याचे प्रयोजन मला वाटत नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केले.