प्रसाद गो. जोशी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थगिती दिलेल्या टॅरिफची स्थगिती बुधवारी संपणार आहे. त्यानंतर काय निर्णय होणार, यावर तसेच कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजाराची दिशा ठरेल. भारत आणि अमेरिकेदरम्यान काही समझोता झाल्यास भारतीय कंपन्यांना टॅरिफमधून सूट मिळू शकते. त्याकडे बाजाराचे लक्ष आहे. याशिवाय परकीय वित्तसंस्था भारतीय बाजाराबाबत काय भूमिका घेतात, याकडेही बाजाराचे लक्ष लागलेले आहे. अमेरिकेत ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीतील मुद्द्यांचीही घोषणा होणार आहे. याचाही बाजारावर परिणाम होणार आहे.
कच्चे तेल आणि डॉलरच्या घसरलेल्या मूल्याचाही बाजारावर परिणाम?
अमेरिकेने याआधी भारतीय उत्पादनांवर २६ टक्के टॅरिफ लागू केले होते. जर याबाबत अन्य काही निर्णय न झाल्यास ते १० जुलैपासून पुन्हा लागू होणार की नाही? याबाबत बाजारात अनिश्चितता आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये टीसीएससह अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्याकडेही गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे.
याशिवाय कच्चे तेल आणि डॉलरच्या मूल्याचाही बाजारावर परिणाम होणार आहे. गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स १६२.६ अंशांनी खाली येऊन ८३,४३२.८९ अंशांवर बंद झाला त्याचप्रमाणे निफ्टीमध्येही घसरण झाली. हा निर्देशांक १७६.८ अंशांनी घसरून २५,४६१ अंशांवर बंद झाला आहे. या सप्ताहातही याच मार्गाने बाजार जाणार का? हे बघणे महत्त्वाचे आहे.
विक्रीचा मोठा मारा
जुलै महिन्यात परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याचे दिसून आले आहे. या सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ५७७३.०६ कोटी रुपयांची विक्री केली आहे.
तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी आपली खरेदी चालूच ठेवलेली दिसून आली. जुलैत देशांतर्गत वित्तसंस्थांनी ४१११.९८ कोटी रुपये बाजारात गुंतविले आाहेत.