टोरंटोस्थित फेअरफॅक्स फायनान्शियल (Fairfax Financial) ही कंपनी आयडीबीआय बँकेमध्ये (IDBI Bank) कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्याकडून बँकेचा हिस्सा खरेदी करण्यासाठी फेअरफॅक्स 'ऑल कॅश ऑफर' देऊ शकते. आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे.
या स्पर्धेत फेअरफॅक्सचा मुख्य सामना कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) सोबत आहे. दोन वर्षांपूर्वी आयडीबीआय बँकेच्या बोली प्रक्रियेत भाग घेण्यासाठी या दोन्ही संस्थांना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
भारतीय वंशाच्या व्यक्तीनं केली स्थापना
फेअरफॅक्स फायनान्शियलची स्थापना भारतीय वंशाचे कॅनेडियन नागरिक प्रेम वत्स यांनी केली आहे. सध्याच्या बाजार मूल्याप्रमाणे, भारत सरकार आणि एलआयसीच्या आयडीबीआय बँकेतील हिस्स्याची किंमत अंदाजे ७ अब्ज डॉलर (सुमारे ६३ हजार कोटी रुपये) इतकी आहे. सध्या आयडीबीआय बँकेचं बाजार भांडवल ₹१.०२ लाख कोटी आहे. या वर्षात (२०२५) आतापर्यंत बँकेचा शेअर सुमारे २५ टक्क्यांनी वाढलाय.
कोटक महिंद्रा बँकही शर्यतीत
आयडीबीआय बँकेत कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याच्या शर्यतीत कोटक महिंद्रा बँक देखील सहभागी आहे. कोटक महिंद्रा बँक रोख आणि शेअर्स अशी बोली लावण्याचा विचार करत आहे. बोली लावण्यासाठी अर्ज या महिन्याच्या अखेरपर्यंत सादर करता येतात, परंतु ही अंतिम मुदत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी एमिरेट्स एनबीडीनंदेखील आयडीबीआय बँकेत हिस्सा घेण्यासाठी 'एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट' (EOI) दाखल केला होता. मात्र, अलीकडेच आरबीएल बँकेमध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करण्याचा करार केल्यामुळे एमिरेट्स एनबीडी बोली प्रक्रियेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. फेअरफॅक्स फायनान्शियल, कोटक महिंद्रा बँक आणि एमिरेट्स एनबीडी यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
तीन वर्षांत शेअर्सचं मूल्य तिप्पट
तीन वर्षांपूर्वी सरकारने आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून आतापर्यंत आयडीबीआय बँकेच्या शेअर्सचे मूल्य तिप्पट झाले आहे. गुरुवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) हे शेअर्स प्रति शेअर ₹९५ दरानं बंद झाले, ज्यामुळे बँकेचे बाजार भांडवल ₹१ लाख कोटींवर पोहोचलं.
फेअरफॅक्स फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा बँक या दोघांचीही भारतीय रिझर्व्ह बँकेनं छाननी केली आहे आणि त्यांना 'फिट अँड प्रॉपर' (Fit and Proper) निकषावर योग्य ठरवलं आहे. आर्थिक बोली सादर करण्यासाठी ही एक आवश्यक अट आहे. फेअरफॅक्स फायनान्शियलकडे सीएसबी बँकेत (CSB Bank) कंट्रोलिंग स्टेक आहे.
