Donald Trump News: २००९ मध्ये तीन खंडांमधील ५ देशांनी ब्रिक्स नावाची संघटना स्थापन केली. कदाचित त्यावेळी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला याचा परिणाम जाणवला नव्हता. पण, या संघटनेच्या ताकदीमुळे आता जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणेजच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अक्षरश: घाम फुटला आहे. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प आजकाल ब्रिक्सचा उल्लेख करताच उत्साहित होतात. शेवटी, ब्रिक्सबद्दल त्यांना असा कोणता धोका वाटतो की ते केवळ संघटनेत सहभागी असलेल्या देशांनाच नाही तर इतर देशांनाही त्यापासून दूर राहण्याची धमकी देत राहतात.
ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे ब्रिक्स देशांची नुकतीच बैठक पार पडली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाग घेतला. ब्रिक्स परिषदेच्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. ब्रिक्स संघटनेने अमेरिकाविरोधी धोरण आखल्यास त्याच्या प्रत्येक उत्पादनावर १० टक्के अतिरिक्त शुल्क लादू, असं त्यांनी खुल्या व्यासपीठावर सांगितलं. एवढेच नव्हे तर संघटनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या इतर देशांना ही धमकी दिली की, ते ब्रिक्समध्ये गेल्यास त्यांना अतिरिक्त १० टक्के शुल्काला सामोरं जावं लागेल.
अफवांपासून दूर राहा; गोल्डन व्हिसा स्कीमच्या अर्जदारांना आवाहन; तुम्हालाही चुकीची माहिती मिळालीये?
सुरुवातीला पाचच देश
ब्रिक्सच्या सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या केवळ ५ देशांचा त्यात समावेश होता, पण आता संघटनांची संख्या १० झाली आहे. इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया हे देशही यात सामील झालेत. आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिका या दोन खंडांतील देशांनी बनलेली ही संघटना जगातील एकूण व्यापारापैकी २० टक्के व्यापार करते. याशिवाय ब्रिक्स देशांकडेही जागतिक जीडीपीच्या ४० टक्के आणि लोकसंख्येच्या ४५ टक्के आहेत. याचा अर्थ ही संस्था स्वत:च एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोठं आव्हान उभं राहण्याचा धोका आहे.
डॉलरच्या वर्चस्वाला धोका
ब्रिक्स देश, विशेषतः रशिया आणि चीन, आता अमेरिकन डॉलरऐवजी त्यांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यापार करत आहेत. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील शिखर परिषदेत आणि २०२४ मध्ये रशियातील कझान येथील शिखर परिषदेत या कल्पनेवर चर्चा झाली होती. जर ब्रिक्स देशांनी आपल्या चलनात व्यापार सुरू केला किंवा डॉलरचा वापर कमी केला तर ते जागतिक व्यापारात डॉलरच्या वर्चस्वाला थेट आव्हान ठरेल अशी भीती ट्रम्प यांना आहे.
भीतीपोटी ट्रम्प काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा धोका म्हणजे डी-डॉलरायझेशनचा आहे. म्हणूनच त्यांनी थेट धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर यावर, जर ब्रिक्स देशांनी डॉलरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर १००% कर लादला जाईल, असं म्हटलं. याचा अर्थ असा की ट्रम्प यांचं लक्ष सर्व १० ब्रिक्स देशांवर आहे.