Shravin Bharti Mittal Left UK : ब्रिटनमध्ये श्रीमंत लोकांसाठीच्या कर नियमांमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेक श्रीमंतांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या 'कर पलायना'मध्ये आता एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचा मुलगा श्राविन भारती मित्तल यांचाही समावेश झाला आहे. ३७ वर्षीय श्राविन यांनी ब्रिटन सोडून संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतर केले आहे.
श्राविन ब्रिटन का सोडून गेले?
श्राविन भारती मित्तल हे यूकेच्या प्रमुख टेलिकॉम कंपनी बीटी ग्रुप पीएलसी (BT Group PLC) चे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा यूकेच्या एका प्रमुख मोबाइल आणि ब्रॉडबँड कंपनीत २४.५% हिस्सा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्राविन यांनी यूके सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्रीमंत लोकांसाठी बदललेले कर नियम. या नवीन नियमांमुळे, जे लोक यूकेमध्ये राहतात. परंतु, मूळचे परदेशातील आहेत (ज्यांना 'नॉन-डोमिसाइल्ड' म्हटले जाते) त्यांना त्यांच्या परदेशी कमाईवर मिळणारी कर सवलत आता मिळत नाही.
सरकारचा बदललेला नियम
मार्च २०२४ मध्ये यूकेच्या कंझर्व्हेटिव्ह सरकारने एक जुना नियम रद्द केला. या नियमानुसार, यूकेचे नसलेल्या लोकांना १५ वर्षांपर्यंत त्यांच्या परदेशी कमाईवर यूकेमध्ये कर भरावा लागत नव्हता. मात्र, जुलैमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर लेबर पार्टीने हा नियम बदलला आणि कराशी संबंधित अनेक नवीन निर्बंध लादले. यामुळे अनेक श्रीमंत लोकांनी ब्रिटन सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे, आणि श्राविन भारती मित्तल हे त्यापैकीच एक आहेत.
कोण आहेत श्राविन भारती मित्तल?
श्राविन भारती मित्तल हे एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांचे पुत्र आहेत. ते अनबाउंड (Unbound) या गुंतवणूक कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत, जी दीर्घकाळ तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करते. श्राविन यांनी लंडनमध्येच अनबाउंड कंपनी सुरू केली होती आणि आता तिची एक शाखा अबू धाबीमध्ये उघडली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सुनील मित्तल यांची एकूण संपत्ती २७.५ अब्ज डॉलर्स (सुमारे २.३० लाख कोटी रुपये) असून, ते जगातील ७२ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
श्राविन यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे, तसेच बाथ विद्यापीठातून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीएससी पदवी घेतली आहे. सॉफ्टबँकमध्ये गुंतवणूकदार आणि बेटर कॅपिटलमध्ये सहाय्यक संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. हार्वर्डमध्ये असताना, त्यांनी ड्रॉपबॉक्समध्ये तीन महिने इंटर्नशिप देखील केली होती.
वाचा - तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
यूकेच्या या नवीन कर नियमांचा परिणाम अजून किती श्रीमंतांवर होतो आणि त्याचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.