US China Trade Deal : सध्या जागतिक स्तरावरुन २ चांगल्या बातम्या हाती आल्या आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे ट्रम्प टॅरिफमुळे २ महासत्तामध्ये सुरू झालेले ट्रेड वॉर आता संपण्याची शक्यता आहे. ट्रम्प टॅरिफमुळे चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्धाचा भडका उडाला होता. या पार्श्वभूमीवर जिनेव्हा येथे दोन्ही देशांमध्ये २ दिवसांची दीर्घ व्यापारी चर्चा झाली. अमेरिका आणि चीनमध्ये लवकरच एक करार होईल. रविवारी व्हाईट हाऊसकडून याबाबत माहिती देण्यात आली. दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाली असून त्याबद्दल सविस्तर तपशील सोमवारी जाहीर केला जाईल, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली.
अमेरिका-चीनची व्यापार चर्चेवर सहमती
बेझंट म्हणाले की, अमेरिका आणि चीनमधील महत्त्वाच्या व्यापार चर्चेत सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत, हे कळवताना त्यांना खूप आनंद होत आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीर यांनी असेही म्हटले आहे की दोन्ही देशांमध्ये तातडीने काही प्रकारचा करार होणे अत्यंत महत्वाचे आहे. पूर्वीचे मतभेद आता राहिले नसल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितले. ग्रीर म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत बरीच चर्चा झाली असून जमिनीवर काम केले गेले आहे. अमेरिकेची व्यापार तूट १.२ ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी आहे. म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत टॅरिफ लादण्याची घोषण केली होती. चीनसोबत होणारा व्यापारी करार अमेरिकेला या संकटातून नक्कीच बाहेर काढेल.
टॅरिफ निर्णयानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेलाच धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवर लादलेल्या टॅरिफला ३ महिन्यांची स्थगिती दिली होती. मात्र, यामुळे चीनसोबतचा टॅरिफ वॉर शिगेला पोहचला होता. दोन्ही देशांनी ऐकमेकांवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्यापर्यंत प्रकरण गेलं. २ महासत्ता देशांमध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत, चीनमधील अॅपलसह अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय भारतात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि चीनमधील या तणावामुळे भारताला थेट आर्थिक फायदा होईल अशी अपेक्षा आहे. खरंतर यात अमेरिकेनेच एक पाऊल मागे टाकल्याचं दिसत आहे.
वाचा - ..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
भारताचीही अमेरिकेसोबत व्यापार चर्चा
भारत अमेरिकेसोबत व्यापार चर्चाही करत आहे. आर्थिक आघाडीवर धक्का बसण्याची भीती आणि भारताला होणारे फायदे यांच्यात, चीन आणि अमेरिका यांच्यातील या व्यापार करारामुळे आर्थिक आघाडीवर बीजिंगला दिलासा मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.