What do BS-4 vehicles do now? | शिल्लक बीएस-४ वाहनांचे आता करायचे तरी काय?

शिल्लक बीएस-४ वाहनांचे आता करायचे तरी काय?

नागपूर/मुंबई : देशात १ एप्रिलपासून बीएस-६ वाहनांच्याच विक्रीच्या नोंदणीला व विक्रीला परवानगी मिळणार असल्याने शिल्लक बीएस-४ वाहनांचे काय करायचे, असा प्रश्न संबंधित कंपन्या व विक्रेत्यांना पडला आहे. त्यानंतर विनानोंदणी वाहनांना भंगारात काढण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे बीएस-४ वाहने लवकर विकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आर्थिक मंदी व बीएस-६ साठी थांबण्याची ग्राहकांची इच्छा यामुळे शिल्लक वाहनांना मागणी नसल्याने कंपन्या व विक्रेते धास्तावले आहेत.

‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लागल्यानंतर वाहनाची नोंदणी होते. नागपुरात तिन्ही आरटीओ कार्यालयांत विनानोंदणीची तीन हजारावर वाहने असून, राज्यात ही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा हजारो वाहनांवर ‘स्क्रॅप’चे संकट उभे ठाकले आहे. वाहन विक्रेत्यांनी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ ला गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयांनी विक्रेत्यांना तातडीने नोंदणीचे पत्र दिले. सध्या नोंदणी न झालेली वाहने नागपूरसह राज्यात २० हजारावर वाहने असल्याचे सांगण्यात येते.

नोंदणीची ३१ मार्च शेवटची तारीख
आहे. सुट्या वगळता त्यासाठी २३ दिवस शिल्लक आहेत. हायसिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागण्यास पाच दिवस
लागतात. एवढ्या कमी दिवसात हजारो ‘बीएस-४’ वाहनांवर नोंदणी होणार कशी,
हा प्रश्न आहे.

...तर वाहने परत करू
सर्वच कंपन्या व विक्रेते यांच्याकडे बीएस-४ वाहने मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. विक्रेत्यांनी नवी आॅर्डर आल्याशिवाय कंपनीकडे मागणीच नोंदवायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
कंपन्या मात्र ही वाहने विक्रेत्यांनी शोरुम व गोदामांत ठेवावीत, यासाठी दबाव आणत आहेत. आम्ही ती ठेवू, पण ती विकली न गेल्यास कंपनीने परत घ्यावीत, असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे.
त्याचमुळे बीएस-६ वाहने १ एप्रिलऐवजी काहीशी उशिरा बाजारात आणण्यात यावीत आणि तोपर्यंत बीएस-४ वाहनांच्या विक्रीला परवानगी मिळावी, असा प्रयत्न आॅटोमाबाइल कंपन्यांनी चालविला आहे. त्यामुळे कदाचित बीएस-६ वाहने बाजारातील प्रवेश लांबू शकेल, अशी शक्यता आहे.

ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ
प्रवासी व व्यावसायिक वाहनांना सध्या मागणी नसली तरी टॅक्टर व तीनचाकी (टेम्पो, रिक्षा) वाहनांची खरेदी मात्र जानेवारीमध्ये वाढली आहे. ही वाढ ५.१ टक्के आहे. लांबलेला पावसाळा हे ट्रॅक्टर खरेदीचे एक कारण आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात शेतीशी संबंधित उपकरणे व ट्रॅक्टर यांच्या खरेदीत वाढ होतच असते.

अनेक ग्राहकांना वाहन विकत घ्यायचे असले तरी बीएस-६ वाहनच घ्यावे, असा त्यांचा विचार दिसत आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या बीएस-४ वाहनांना फारशी मागणी नाही. - आशिष काळे, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ आॅटोमोबाइल डीलर्स असोसिएशन

Web Title: What do BS-4 vehicles do now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.